Tue, Apr 23, 2019 20:12होमपेज › Ahamadnagar › प्रभागात कामांसाठी उरले अडीच महिने!

प्रभागात कामांसाठी उरले अडीच महिने!

Published On: Jul 12 2018 1:39AM | Last Updated: Jul 12 2018 1:39AMनगर : मयूर मेहता

महापालिकेची मुदत संपण्याच्या तीन महिने अगोदरपासून नगरसेवकांना स्वेच्छा निधीच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. नगर महापालिकेची मुदत डिसेंबरमध्ये संपत असल्यामुळे त्या अगोदर तीन महिने म्हणजेच सप्टेंबरपर्यंतच स्वेच्छा निधीतून विकासकामे करता येणार आहेत. आयोगाच्या आदेशानुसार सप्टेंबरनंतर नव्याने कार्यारंभ आदेश देण्यास मनाई आहे. तर कार्यारंभ आदेश दिलेली मात्र प्रत्यक्ष सुरु नसलेली स्वेच्छा निधीतील कामेही 1 ऑक्टोबरपासून सुरु करता येणार नाहीत. त्यामुळे प्रभागात स्वेच्छा निधीतून कामे करण्यासाठी नगरसेवकांना केवळ अडीच महिन्यांचा कालावधी उरला आहे.

महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांना प्रभागात कामांसाठी स्वेच्छा निधी उपलब्ध करून दिला जातो. निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्यानंतर कामे करण्यास यापूर्वीच निर्बंध घातलेले आहेत. मात्र, महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी व आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच्या कालावधीत निवडणुकांच्या तोंडावर मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी स्वेच्छा निधीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान नोंदविले होते.

त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी महापालिकेची मुदत संपण्याच्या तीन महिने आधीपासून कोणत्याही लोकप्रतिनिधींना त्या महापालिका क्षेत्रातील कामांवर स्वेच्छा निधीतून खर्च करता येणार नाही, असे आदेश निवडणूक आयोगाने 2016 मध्येच बजावलेले आहेत. त्यानुसार अखेरच्या तीन महिन्यात नवीन कामांचे प्रस्ताव मंजूर होणे तर दूरच, मात्र, जी कामे मंजूर आहेत, त्याचे कार्यारंभ आदेशही देता येणार नाही. तसेच कार्यारंभ आदेश देऊनही जी कामे सुरु झालेली नसतील ती अखेरच्या तीन महिन्यात सुरु करता येणार नसल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. जी कामे प्रत्यक्षात सुरु आहेत, अशी कामे सुरु ठेवण्यास मात्र आयोगाने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत.

महापालिकेची मुदत येत्या डिसेंबरमध्ये संपुष्टात येणार असून सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभागात नवीन विकासकामे मंजूर करुन घेण्यासाठी नगरसेवकांची धडपड सुरु आहे. अनेक नगरसेवकांनी कामे मंजूर करुनही घेतली आहेत. येत्या महिनाभरात या कामांच्या उद्घाटनांचा धडाकाही सुरु होणार आहे. मात्र, आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी तीन महिने अगोदर म्हणजे सप्टेंबर अखेरपर्यंतच नव्याने कामे सुरु करता येणार आहेत. स्थानिक पातळीवर संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्‍तांकडून याबाबतचे आदेश बजावले जाणार आहेत. आयोगाच्या या आदेशामुळे निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रभागांमध्ये विकासकामांच्या उद्घाटनांचा सपाटा लावणार्‍या नगरसेवकांना चपराक बसणार आहे.