Tue, Apr 23, 2019 20:23होमपेज › Ahamadnagar › सीना पात्रात आढळले पुरातन अवशेष!

सीना पात्रात आढळले पुरातन अवशेष!

Published On: Jun 09 2018 1:32AM | Last Updated: Jun 09 2018 12:28AMनगर ः प्रतिनिधी

‘मिशन सीना’ मोहिमेंतर्गत नदी पात्रातील भराव हटविण्याचे काम सुरु असतांना काटवन खंडोबा पूल ते अमरधाम पर्यंतच्या पात्रातील भागात पुरातन बांधकामाचे अवशेष आढळून आले आहेत. जुन्या काळातील ‘सीना घाटा’चे हे अवशेष असल्याचा दावा केला जात असला तरी सदरचे बांधकाम हे निजामशाही काळातील पाण्याचा हौद असावा, असा प्राथमिक अंदाज ऐतिहासिक वास्तू संग्रहालयाचे अभिरक्षक व इतिहास संशोधक प्रा. संतोष यादव यांनी म्हटले आहे.

नदी पात्रातील भराव हटविण्याचे काम वेगात सुरु आहे. काटवन खंडोबा पुलापासून अमरधाम, नेप्ती रोडवरील पुलाच्या दिशेने पोकलॅनच्या साहाय्याने भराव हटविला जात आहे. गुरुवारी (दि.7) भराव हटविण्याचे काम सुरु असतांना विहिरीसदृष्य बांधकाम असल्याचे कर्मचार्‍यांना आढळून आले. काल (दि.8) या बांधकामाजवळील भराव हटविण्यात आल्यानंतर सदरचे अवशेष हे पुरातन कालीन असल्याचे पुढे आले आहे. मनपा अधिकार्‍यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांसह इतिहास संशोधक प्रा. यादव यांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ जावून पाहणी केली.विहीर अथवा पाण्याच्या हौदासारखे हे बांधकाम आहे. ‘दो बोटी चिरा’, बागरोजा आदी सारख्या पुरातन वास्तूच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले दगड आणि या बांधकामाचे दगड यात साम्य आहे. या परिसरात पाहणी केली आहे. सदरचे बांधकाम हे निजामशाहीच्या काळातील पाण्याचा हौद असावा, सीना घाटाचे हे बांधकाम नसावे, असा अंदाज आहे. मात्र, त्यात मोठ्या प्रमाणात गाळ व झुडपे आहेत. ती काढण्यात आल्यानंतरच या बांधकामाबाबत स्पष्ट करता येईल. दरम्यान, सदरचे बांधकाम हे जुन्या सीना घाटाचे असल्याचा दावाही काहींनी केला आहे.