Sun, Jul 21, 2019 12:05होमपेज › Ahamadnagar › शुध्द पाण्याची गंगा कर्जतकरांच्या अंगणी

शुध्द पाण्याची गंगा कर्जतकरांच्या अंगणी

Published On: May 22 2018 1:23AM | Last Updated: May 21 2018 11:03PMकर्जत : गणेश जेवरे

कर्जत व पाणी टंचाई, अशी ओळख कर्जत शहराची होती. मात्र आता खेड येथून नवीन पाणी योजनेचे उद्घाटन नुकतेच झाले. त्यामुळे नळावाटे नागरिकांना शुद्ध व गोड पाणी पिण्यास मिळणार आहे. या योजनेमुळे अनेक पिढ्यांचे स्वप्न पालकमंत्री प्रा. राम शिंदे व कर्जत शहराचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत या ‘राम-लक्ष्मणा’च्या जोडीमुळे पूर्ण झाले आहे. त्यामुळे कर्जतकरांसाठी कालचा दिवस खर्‍या अर्थाने आनंदाचा होता. मात्र योजना पूर्ण झाली असून, नागरिकांना पुरेसे व शुद्ध पाणी देण्याची खरी जबाबदारी आता पालिकेची आहे.  

कर्जतकरांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी उजनी जलाशयातून खेड (ता. कर्जत) येथून फक्‍त कर्जत शहरासाठी 28 कोटी रुपयांची स्वतंत्र पाणी योजना ना. शिंदे यांनी मंजूर केली. मात्र यासाठी नगराध्यक्ष राऊत यांनी केलेला पाठपुरावा दुर्लक्षीत करून चालणार नाही. नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी नगराध्यक्ष राऊत यांनी सत्ता आल्यास पाणी योजना सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते. अखेर त्यांनी त्यांचा शब्द खरा केला. 

कर्जतकरांची स्वप्नपूर्ती

कर्जत शहरासाठी ना. शिंदे व नगराध्यक्ष राऊत यांच्या प्रयत्नातून 28 कोटी 19 लाच 38 हजार रुपयांची खेड येथून भीमा नदीच्या फुगवट्यावर पाणी योजना मंजूर करण्यात आली. या योजनेचे काम ठेकेदारांनी वेळेत पूर्ण केले. आता पालिकेने ही योजना व्यवस्थित चालवावी. यापूर्वीच्या योजनांचा अनुभव पाहता, जास्त जबाबदारीने कर्मचार्‍यांना काम करावे लागणार आहे. 

कर्जत शहरात पूर्वी लोकसंख्या कमी होती. फारसा विकास नव्हता. मात्र पाऊस चांगला पडत असतानाही नळ योजना नव्हती. म्हणून गावामध्ये असलेल्या राशीन बारव, भणगेगल्लीमधील आड यासह जवळपास प्रत्येक गल्लीमध्ये असलेल्या विहिरीमधून कावडीने पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर 1983 साली थेरवडी पाणी योजना झाली. ही पाणी योजना स्टँड पोस्ट होती. प्रत्येक गल्लीमध्ये एक नळकोंडाळे तयार करून त्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. या कोडाळ्यांवर प्रसंगी अनेक वेळा वाद देखील होऊ लागले. काहींनी जलवाहिनीवरून परस्पर नळजोड घेतले. पावसाचे प्रमाण कमी होऊ लागले. थेरवडी तलाव कोरडा पडला की पाणी योजना बंद पडत असे. अशा वेळी टँकर हाच एकमेव पर्याय होता. 

तसेच काही हातपंपांवरून रात्री-बेरात्री नागरिक सायकलला ड्रम बांधून पाणी आणत. त्यामुळे उन्हाळ्यात कर्जत शहर रात्रभर पाण्यासाठी जागे राहात. याच दरम्यान कर्जतसाठी कापरेवाडी वेस, पळसवाडा या पाणी योजना नवीन झाल्या. मात्र त्या पण कुचकामी ठरल्या असतानाच माजी आ. विठ्ठलराव भैलुमे यांच्या प्रयत्नाने कर्जत व राशीन गावांसाठी  खेड येथून संयुक्त पाणीपुरवठा योजना करण्यात आली. यात शुद्धीकरण टाकी राशीन येथे करण्यात आली. या पाणी योजनेमध्ये आर्धी जलवाहिनी ही पीव्हीसी होती. त्यामुळे सतत पाईप लाईन फुटत असे. त्यामुळे कर्जतकरांसाठी ही पाणी योजना मृगजळच ठरली. 

त्यामुळे आजही कर्जतकर थेरवडी पाणी योजनेवर अवंलूबन आहेत. मात्र या पाणी योजनेस शुध्दीकरण व्यवस्था नसल्याने थेट तलावातील पाणी नळवाटे नागरिकांना पुरवले जाते. त्यामुळे हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याने नागरिक पिण्यासाठी शुद्ध पाण्याचे जार विकत घेत आहेत. मागील तीन वर्षे दुष्काळ होता. या काळात खासगी पाणी विक्रेते टँकरद्वारे पाण्याची विक्री करत. 

काळ्या पाण्याची शिक्षा

कर्जत शहरामध्ये सतत पाणी टंचाई असते. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होतात. राज्यात कोणत्याही विभागात एखादा अधिकारी किंवा कर्मचारी काम चांगला करीत नसेल व त्याला याची शिक्षा द्यावयाची असल्यास त्यांची बदली कर्जत तालुक्यात करण्यात येत. याची तुलना पूर्वी इंग्रजांच्या राजवटीत जशी काळ्या पाण्याची शिक्षा होती, तशी कर्मचार्‍यांना शिक्षा देण्यासाठी येथे पाठवण्यात येई. या पाणी टंचाईच्या झळा कर्जत मधील नागरिकांनी अनेक पिढ्या सोसल्या आहेत. मात्र आता कर्जतकरांना अच्छे दिवस येणार आहेत.