Wed, Jul 17, 2019 12:00होमपेज › Ahamadnagar › शेवगावमध्ये कडकडीत बंद 

शेवगावमध्ये कडकडीत बंद 

Published On: Feb 18 2018 1:54AM | Last Updated: Feb 17 2018 11:12PMशेवगाव : प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असल्याने त्यांनी लक्ष घालून छिंदमच्या विरोधात अजामीनपात्र, दखलपात्र असा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. समाजविघातक प्रवृत्तींवर कडक कारवाई करावी, अन्यथा शिवप्रेमी जनता रस्त्यावर उतरून कायदा हातात घेईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहिल, असा इशारा अ‍ॅड. सुभाष लांडे यांनी दिला आहे.

उपमहापौर श्रीकांत छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण केल्याच्या निषेधार्थ काल शेवगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कम्युनिष्ठ, मनसे, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी शेतकरी संघटना, चर्मकार संघटना, मुस्लिम समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांच्या वतीने शेवगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. क्रांती चौकामध्ये छिंदम यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत अँड. लांडे बोलत होते. यावेळी अ‍ॅड.अविनाश मगरे, माजी प्राचार्य शिवाजी देवढे,  ताहेर पटेल, संजय नांगरे, शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष दत्ता फुंदे आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

संजय फडके म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या पुस्तकांसाठी 60 लाखांची तरतूद व शिवाजी महाराजांवरील पुस्तकांसाठी फक्त साडेतीन लाखाची तरतूद करून भाजपने शिवरायांचा अपमान केला आहे. उपमहापौर छिंदम याने जाणिवपूर्वक शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. छिंदम याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र फक्त गुन्हा दाखल न करता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. समाजामध्ये फूट पाडणार्‍या आरएसएस सारख्या समाजविघातक संघटनेवर सरकारने त्वरीत बंदी घालावी. 

या आंदोलनामध्ये गणेश रांधवणे, अजिंक्य लांडे, कृष्णा ढोरकुले, संतोष भुसारी, नगरसेवक सागर फडके, वजीर पठाण, शिवसेनेचे तालुकाप्रमुख भरत लोहकरे, सुनिल जगताप, शीतल पुरनाळे, शरद जोशी, रिजवान शेख आदींसह ग्रमस्थ व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

शेवगाव बार असोसिएशनच्या वतीने शेवगाव येथे काम बंद आंदोलन करून या घटनेचा निषेध करण्यात आला. खानापूर येथील महिलांनी गाव बंद ठेवून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा दुर्गा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन दिले. तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी गावातील व्यवहार बंद ठेवून या घटनेचा निषेध कऱण्यात आला.