Mon, Jun 24, 2019 16:38होमपेज › Ahamadnagar › तपास ‘सीआयडी’कडे सोपविण्याचा प्रस्ताव

तपास ‘सीआयडी’कडे सोपविण्याचा प्रस्ताव

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 10:51PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्याबाबत पोलिस महासंचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी काल (दि. 15) दिली.

केडगाव हत्याकांडाच्या तपासाबाबत काही नातेवाईकांनी संशय व्यक्त केलेला आहे. उपोषणही केलेले आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास निःपक्षपातीपणे व्हावा, अशी नातेवाईकांची मागणी होती. नातेवाईकांच्या मागणीनुसार या हत्याकांडाचा तपास ‘सीआयडी’कडे सोपविण्यात यावा, असा प्रस्ताव तयार करून नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आलेला आहे. तेथून हा प्रस्ताव राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांच्याकडे जाईल. त्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास तपास ‘सीआयडी’कडे वर्ग होईल. या प्रस्तावावर पोलिस महासंचालक नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गुन्ह्याच्या तपासासाठी नियुक्त केलेल्या ‘एसआयटी’चे प्रमुखपदी मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमुख बदललेले असले, तरी विशेष तपास पथकामध्ये पूर्वी नियुक्त केलेल्या श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, सहाय्यक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, पोलिस निरीक्षक सुनील पवार, दिलीप पवार, सुरेश सपकाळे यांचा समावेश कायम आहे.