Wed, Jul 24, 2019 12:59होमपेज › Ahamadnagar › सूत्रधार रोहिदास सातपुतेला पोलिस कोठडी

सूत्रधार रोहिदास सातपुतेला पोलिस कोठडी

Published On: May 22 2018 1:23AM | Last Updated: May 21 2018 11:15PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेतील पथदिवे घोटाळ्याचा मुख्य आरोपी अभियंता रोहिदास सातपुते हा काल (दि. 21) सकाळी तोफखाना पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याच्या अटकेची कार्यवाही पूर्ण करून, दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत (दि. 24) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

पथदिवे घोटाळाप्रकरणी साडेतीन महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तेव्हापासून सातपुते हा फरार होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध स्टँडिंग वॉरंट जारी करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतरही तो हजर न झाल्यास मालमत्ता जप्तीची कार्यवाही करण्यात येणार होती. त्यामुळे सातपुते हा हजर होण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘पुढारी’त सोमवारच्या (दि. 21) अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर सोमवारीच सातपुते हा पोलिसांना शरण आला.

त्याला दुपारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीपाद देशपांडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे म्हणाले की, वादग्रस्त कामे विद्युत विभागाची होती. सातपुते हा त्या विभागाचा प्रमुख होता. त्यानेच कामांच्या सर्व मूळ फायली त्यांच्या फोर्ड फिगो कारमधून गायब केल्या आहेत, असा जबाब यापूर्वी अटक केलेला लिपिक भरत काळे व ठेकेदार सचिन लोटके याने दिलेला आहे. 

सातपुते याला लाचेपोटी 5 लाख रुपये दिल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे. त्याअनुषंगाने आरोपीकडे चौकशी करायची आहे. सदर कामांची महापालिकेच्या बजेट रजिस्टरला नोंद नाही. कामे बोगस आहेत. घोटाळ्याची सविस्तर चौकशी करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली.

आरोपीचे वकील अ‍ॅड. सुभाष काकडे यांनी आरोपीच्या बचावाचा प्रयत्न केला. आरोपीकडे अतिरिक्त पदभार होता. त्याच्या पोलिस कोठडीसाठी पोलिसांनी दिलेली कारणे समर्पक वाटत नाहीत. त्याचा या घोटाळ्याशी काही संबंध नाही, असे सांगितले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी रोहिदास सातपुते याला गुरुवारपर्यंत (दि.24) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.