Tue, Sep 17, 2019 22:00



होमपेज › Ahamadnagar › भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकता : विखे

भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकता : विखे

Published On: Jun 13 2019 1:30AM | Last Updated: Jun 13 2019 1:08AM




संगमनेर : प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे युतीचा प्रचार केला असल्याने पक्ष प्रवेशाची फक्त औपचारिकता राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेचे समर्थन करीत त्यांच्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरू असल्याकडे लक्ष वेधून मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस कधी याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले .

माजी मंत्री विखे पाटील  संगमनेरात एका खासगी कार्यक्रमाच्या निमिताने आले होते. तालुक्यातील खांडगाव येथे त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. निळवंडे धरण कालव्यांच्या कामाबाबत झालेल्या निर्णयाबद्दल ग्रामस्थ व  कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांचे अभिनंदन करून आभार मानले.

याबाबत माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की, निळवंडे कालव्यांच्या प्रश्‍नांसाठी गेली अनेक वर्षे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी पक्षविरहीत संघर्ष केला, त्याचे हे यश आहे. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी जिरायती भागातील पाणी प्रश्‍नाबाबत मांडलेली भूमिका प्रत्यक्षात उतरत असल्याचे समाधान आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्‍नाचे गांभीर्य ओळखून  तातडीने बोलावलेल्या बैठकीत झालेले  निर्णय महत्त्वपूर्ण असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेले सहकार्य आणि ज्येेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव  पिचड यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे हे यश असल्याचे माजी मंत्री विखे यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.

काँग्रेसची चिंतन करण्याचीही वेळ गेली!

काँग्रेस पक्षात मुख्यमंत्री पदाचे  स्वप्न पाहाणार्‍या असंख्य नेत्यांमुळेच पक्षाची अधोगती झाली. या नेत्यांनी आता बाजूला होऊन नव्यांना संधी द्यावी. काँग्रेस  पक्षात आता चिंतन करण्याचा सुध्दा विषय संपला असल्याची टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली.