होमपेज › Ahamadnagar › लालपरी अनास्थेच्या फेर्‍यात

लालपरी अनास्थेच्या फेर्‍यात

Published On: Mar 15 2018 1:17AM | Last Updated: Mar 14 2018 10:16PMजामखेड : वार्ताहर

जामखेड आगारातील अनेक बस जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे त्या रस्त्यातच बंद पडत आहेत. या बंद पडलेल्या बस दुरुस्तीसाठी ओरिजिनल स्पेअर पार्टस्ही मिळत नाही. त्यामुळे कर्मचारी हतबल झाले आहेत. कालच कोल्हापूर-जामखेड बस तालुक्यातील पाटोदा हद्दीत बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. लालपरी आजारातून कधी बाहेर निघणार, असा सवाल प्रवाशांतून विचारला जात आहे.

बीड, सोलापूर, उस्मानाबाद, नगर या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर जामखेड तालुका आहे. त्यामुळे येथे एसटी बसची व प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र जामखेड आगाराच्या एसटी बस सातत्याने रस्त्यातच बंद पडत असल्याने प्रवासी संख्या घटत आहे. त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होऊ लागला आहे. अनेक बस कालबाह्य झाल्या असूनही त्या रस्त्यावर धावत असल्याने एसटी प्रशासन प्रवाशांसह एसटी कर्मचार्‍यांच्या जीविताशीच खेळात आहे. एसटी बस बंद पडण्याचे चित्र शहरात नवीन नाही. दिवसभरातून शहरासह तालुक्यात बस कुठे तरी बंद पडलेली असते. याकडे वरिष्ठ पातळीवरून लक्ष देण्याची मागणी प्रवाशी करत आहेत.

बस अचानक बंद पडलेने प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागला. महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना त्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. वारंवार घडणार्‍या या घटनांमुळे प्रवाशांमधून तसेच एसटी कर्मचार्‍यांमधूनही संताप व्यक्त होत आहे. आगारातून बाहेर पडत असताना बसमध्ये काही बिघाड आहे का, याची तपासणी होत नसल्याने अशा घटना घडत असल्याचे  निदर्शनास येत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यावरच अधिकारी जागे होणार का, असा सवालही संतप्त प्रवाशांतून केला जात आहे.

प्रवाशांच्या सेवेसाठी, असे ब्रीद एसटीचे आहे. परंतु बसच्या तुटलेल्या खिडक्या, फाटकी बाकडे, पावसाळ्यात गळक्या छतामधून टपकणारे पावसाचे पाणी, ही दुरवस्था पाहता प्रवाशांच्या सेवेसाठी ऐवजी प्रवाशांचे कंबरडे मोडण्यासाठी, प्रवाशांची हाडे खिळखिळी करण्यासाठी, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

अनेक बसची दुरवस्था झाली आहे. आगारात बसची संख्या 67 आहे. यामध्ये दोन शिवशाही बस दाखल झाल्या आहेत. चालक व वाहकांची संख्याही अपुरी आहे. आगारात अनेक महत्त्वाच्या समस्या असताना बसमध्ये वाय-फायची यंत्रणा बसविण्यात आली आहे. बसबरोबरच रस्त्याचीही झालेली दुरवस्था यामुळे बसमधील प्रवाशांना आलेला मोबाईल उचलून बोलणे अवघड आहे.