Wed, Aug 21, 2019 01:56होमपेज › Ahamadnagar › अपहाराचा आकडा जुळेना!

अपहाराचा आकडा जुळेना!

Published On: May 23 2018 1:06AM | Last Updated: May 22 2018 11:18PMनगर : प्रतिनिधी

जामखेड पंचायत समितीत सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे निवृत्ती वेतन परस्पर काढून अपहार केल्याचा प्रकार उघडकीस येऊन बारा दिवस झाले आहेत. मात्र प्रशासनाला अद्यापही अपहाराची नेमकी रक्कम किती? याचा आकडा जुळविता आलेला नाही. संबंधित कर्मचार्‍याने केलेल्या ‘कृष्णकृत्यांचा’ अहवाल तपास पथकाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे दिला आहे. अपहाराची रक्कम जवळपास 55 लाखांच्या आसपास असल्याचे कळते.

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे निवृत्ती वेतन परस्पर लाटल्याचा प्रकार जामखेड पंचायत समितीमध्ये उघड झाल्यानंतर कक्ष अधिकार्‍यांनी सामान्य प्रशासन विभागाला सील ठोकले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाचे पथक चौकशी करण्यासाठी जामखेड पंचायत समितीत गेले होते. पथकाने चौकशी केल्यानंतर संबंधित कर्मचार्‍याने केलेल्या अपहारानुसार त्याच्यावर काय कारवाई करता येईल याचा अहवाल दिला आहे.

शासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर देण्यात येणारे निवृत्तीवेतन संबंधित कर्मचारी व त्यांच्या वारसाचा मृत्यू झाल्यावर बंद करण्यात येते. मात्र, मयत निवृत्त वेतनधारकांच्या बँक खात्यातून पैसे काढून आपल्या खात्यात वर्ग करण्याचा प्रताप पंचायत समितीचा एक कर्मचारी गेल्या कित्येक महिन्यांपासून करत होता. यामुळे जामखेड पंचायत समितीच्या सामान्य प्रशासन विभाग कक्ष अधिकारी संजय छैलकर यांनी 9 मे रोजी पंचनामा करून सायंकाळी उशिरा कूलूप लावून सील केले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी 10 मे रोजी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाचे पथक आले होते. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला लावलेले सील काढून सविस्तर चौकशी केली.

सदर कर्मचार्‍याकडे पंचायत समितीच्या अर्थ विभागाची जवाबदारी आहे. निवृत्त कर्मचार्‍यांचे पगार येथे नेमणुकीस असलेला कर्मचारी काढतो. मात्र, मयत झालेल्यांची नावे कमी न करता त्यांच्या नावे जमा होणारी रक्कम पंचायत समितीच्या खात्यातून स्वतःच्या खात्यात जमा करण्याचा प्रताप त्याने केला होता. सदर कर्मचार्‍याची खातेनिहाय चौकशी करून नंतरच गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.