Tue, Dec 10, 2019 13:27होमपेज › Ahamadnagar › कुकडी, घोडचा पाणीसाठा वाढण्याची गरज : अण्णा हजारे

कुकडी, घोडचा पाणीसाठा वाढण्याची गरज : अण्णा हजारे

Published On: Jun 17 2019 2:08AM | Last Updated: Jun 17 2019 2:08AM
श्रीगोंदा :  प्रतिनिधी 

कुकडी व  घोड प्रकल्पात पाणीसाठा वाढविणे ही काळाची गरज आहे.  डिंबे ते माणिकडोह बोगद्याच्या कामाची आपण शिफारस जलसंपदा मंत्र्यांकडे केली आहे  हा  बोगदा झाला, तर कुकडीचे एक आवर्तन वाढण्यास मदत होईल, असा विश्‍वास जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी केला. 

श्रीगोंदा येथे घोड कुकडी पाटपाणी कृती समितीने आयोजित केलेल्या  पाणी परिषदेत  हजारे बोलत होते. परिषदेस आदर्श ग्राम समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, आ. राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, प्रतिभा पाचपुते, मनोहर पोटे  राजेंद्र म्हस्के, एकनाथ आळेकर, माऊली मोटे, बाळासाहेब महाडिक, अनिल ठवाळ उपस्थित होते. हजारे म्हणाले की, कुकडी घोड पाणीपरिषदेमुळे पाणीप्रश्‍न नेमका अडचणीचा कशामुळे झाला आहे, यावर विचारमंथन झाले आहे, ही समाधानाची बाब आहे. . भविष्यात कुकडी व घोडच्या पाण्याचे समप्रमाणात वाटप होण्यासाठी युवकांनी आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे.  मला युवकांच्या लढ्याचे नेतृत्त्व करण्यास आवडेल, असा विश्‍वास हजारे यांनी व्यक्त केला.

पवार म्हणाले की, जगातील  शंभर देशांसमोर जलसंकट उभे राहिले आहे. .  लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघ तयार झाल्याने शहरी भागातून जादा लोकप्रतिनिधी पुढे आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होऊ लागले, ही वस्तुस्थिती आहे. धरणातील  शेतीचे पाणी शहराकडे जाऊ लागले आहे. एकदा धरणातील पाण्याचे ऑडिट करण्याची गरज आहे. मतपेटी आणि राजकारण यात पर्यावरण व पाण्याचा प्रश्‍न जटील बनला आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून जनजागृती झाली पाहिजे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

आमदार राहुल जगताप म्हणाले की, अण्णा हजारे यांनी लक्ष घातल्यामुळे डिंबे, माणिकडोह बोगद्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. आता पाटपाणी परिषदेच्या माध्यमातून कुकडी आणि घोडच्या पाण्याचे वास्तव काय आहे हे समोर येण्यास मदत झाली आहे. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे.

नागवडे म्हणाले की,  भविष्यात पाण्याची बचत करून जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी बंदिस्त पाणी वापर पद्धतीचे धोरण  सरकारने आखले पाहिजे. पाटपाणी कृति-समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के म्हणाले की, या पाटपाणी परिषद घेण्यामागे कुकडी आणि घोड प्रकल्पाची वस्तुस्थिती समोर आणायची होती, या प्रश्‍नाचे केवळ राजकीय भांडवल करून चालणार नाही. त्यासाठी ठोस पावले उचलावी लागणार आहेत. आम्ही हक्काच्या पाण्यासाठी आग्रही भूमिका घेणार आहोत.