Tue, Mar 26, 2019 11:41होमपेज › Ahamadnagar › ढवण यांचा महापौर दालनात धिंगाणा!

ढवण यांचा महापौर दालनात धिंगाणा!

Published On: May 23 2018 1:06AM | Last Updated: May 22 2018 11:02PMनगर : प्रतिनिधी

गेल्या अडीच वर्षांच्या काळात स्वपक्षाकडूनच माझी आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न केला जातो. निधी वाटपातही मला डावलले जाते. माझ्या प्रभागातील प्रश्‍नाच्या बैठकीसाठी निमंत्रणही दिले जात नाही. वारंवार पाठपुरावा करुनही प्रश्‍न मार्गी लागत नाहीत. त्यामुळे या सत्तेचा आम्हाला काय उपयोग? असा सवाल करत शिवसेना जिल्हा उपप्रमुख दिगंबर ढवण यांनी महापौर सुरेखा कदम यांना अरेरावी करत महापौर पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. एकतर तुम्ही राजीनामा द्या, नाहीतर माझा राजीनामा घ्या, असे म्हणत ढवण यांनी महापौरांच्या दालनात धिंगाणा घातला.

सावेडी कचरा डेपोला लागलेली आग विझविण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. पाणी मारूनही आग विझत नसल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचा दावा करत, ढवण यांनी मनपावर मोर्चा काढून कायमस्वरुपी उपाययोजनांची मागणी केली. प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी चर्चा करण्यास नकार देत, प्रभारी अतिरिक्‍त आयुक्‍त संतोष धोंगडे यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ढवण यांच्यासह सभागृह नेते गणेश कवडे, नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव, विक्रम राठोड, योगीराज गाडे यांनी धोंगडे यांच्याशी चर्चा केली. उपाययोजनांबाबत चर्चा झाल्यानंतर ढवण यांनी निवेदन देण्यासाठी महापौर कार्यालयाकडे मोर्चा वळविला.

महापौर दालनात आल्यानंतर ढवण यांनी सुरेखा कदम यांच्याशी चर्चा करुन आयुक्‍तांशी चर्चा करण्यासाठी खाली येण्याची मागणी केली. महापौरांनी नकार देत चर्चा करुन प्रश्‍न मार्गी लावू, असे सांगताच ढवण यांनी महापौर कदम यांच्यावरच आगपाखड केली. तुम्ही वारंवार माझी आंदोलने दडपता. माझ्या प्रभागाचा विषय असतांना बैठकीसाठी मला निमंत्रणही देत नाहीत. नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत शिष्टमंडळ घेवून येणार असल्याची पूर्वसूचना दिली होती. त्यानंतरही तुम्ही डेपोची पाहणी करण्यासाठी गेला. त्यामुळे अधिकार्‍यांना आम्हाला दाद दिली नाही. या सत्तेचा आम्हाला उपयोग होत नसेल तर तुमचा फायदा काय? एकतर तुम्ही पद सोडा, नाहीतर माझा राजीनामा घ्या, अशी मागणी करत ढवण यांनी कदम यांना अरेरावी केली. आज आम्हाला न्याय मिळाला नाही, तर आम्ही येथून हलणार नाही. आम्हाला अटक झाली तरी चालेल. यापुढे उपनगरात तुम्हाला जाब न विचारल्यास भिस्तबाग चौकात स्वतःला टांगून घेईन. आमच्यामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळे आम्ही नाही. तुम्ही जागा सोडा नाहीतर माझा राजीनामा घ्या, त्याशिवाय येथून हलणार नाही, अशी भूमिका ढवण यांनी घेतल्यामुळे दालनात तणाव निर्माण झाला.

महापौर दालनात सुरु असलेल्या या ‘धिंगाण्या’ची माहिती मिळताच सभागृह नेते कवडे, दत्तात्रय मुदगल, हनुमंत भुतकर, सचिन जाधव यांनी तिकडे धाव घेतली. ढवण यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न झाला. शिवसेना उपनेते अनिल राठोड, संभाजी कदम आदींसह काही प्रमुख पदाधिकारी मुंबईत होते. त्यामुळे राठोड यांनी मुंबईतून फोनवर त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, ढवण यांनी त्यांनाही जुमानले नाही. त्यांचा राजीनामा घ्या किंवा माझा राजीनामा घ्या, याच भूमिकेवर ते ठाम होते. बराचवेळा सुरू असलेला धिंगाणा थांबविण्यासाठी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे निर्माण झाल्यानंतर काही पत्रकारांनीही ढवण यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला पदही नको. मला कुणाशी चर्चाही करायची नाही, याबाबत मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. पुन्हा महापौर कार्यालयाची पायरी चढणार नाही, असे म्हणत ढवण यांनी दालन सोडले.

आयुक्तांनी चर्चा टाळण्याचे कारण काय?

मनपाच्या आयुक्‍तपदाचा प्रभारी कार्यभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आहे. सावेडी कचराडेपोच्या आगीच्या घटनेची संपूर्ण माहिती त्यांना होती. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली असती, तर पुढील प्रकारही टळला असता. मात्र, त्यांनी पदाधिकारी, नगरसेवकांशी चर्चाच न करण्याचे धोरण सध्या स्वीकारले आहे. तसेच आंदोलकांनाही त्यांनी पिटाळून लावले. या रागातूनच ढवण यांनी महापौरांना धारेवर धरल्याची चर्चा असून, आयुक्‍तांनी चर्चा टाळण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अरेरावीनंतर महापौरांना अश्रू अनावर!

महापौर दालनात झालेल्या गदारोळामुळे महापौर सुरेखा कदम यांना चांगलाच धक्का बसला. स्वपक्षातील असलेल्या ढवण यांच्या अरेरावीमुळे त्यांना अश्रू अनावर झाले. ढवण यांना बैठकीत टाळण्याचा कुठलाही हेतू नव्हता. त्यांनी अशा पद्धतीने येऊन धिंगाणा घालणे चुकीचेच आहे. कचरा डेपोच्या प्रश्‍नाबाबत मी स्वतः शारदा ढवण यांच्या कायम संपर्कात होते. आंदोलनाच्या माध्यमातून धिंगाणा घालणे, हे त्यांचे कायमचेच झालेय, अशा शब्दांत महापौरांनी नाराजी व्यक्‍त केली.

पदाधिकारी, नगरसेवकांकडून नाराजी व्यक्‍त!

दिगंबर ढवण यांनी महापौर दालनात घातलेल्या गदारोळानंतर पदाधिकारी व नगरसेवकांनीही नाराजी व्यक्‍त केली. ढवण यांच्याबरोबर आम्ही धोंगडे यांच्याशी चर्चा केली. त्यांचे समाधानही झाले होते. महापौरांना निवेदन देण्यासाठी ते दालनात आले होते. त्यानंतर घडलेला प्रकार चुकीचा आहे. पक्षात लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला म्हणणे मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय होईल, असे सभागृह नेते गणेश कवडे व सचिन जाधव यांनी सांगितले.