Thu, Apr 25, 2019 03:28होमपेज › Ahamadnagar › सचिन लोटके गजाआड

सचिन लोटके गजाआड

Published On: Mar 02 2018 1:20AM | Last Updated: Mar 02 2018 1:19AMनगर : प्रतिनिधी

बहुचर्चित पथदिवे घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या ठेकेदार सचिन लोटके याला बुधवारी रात्री शहरातूनच तोफखाना पोलिसांनी अटक केली. काल गुरुवारी दुपारी लोटकेला न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला दि. 5 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

महापालिकेतील 34.56 लाख रुपयांच्या पथदिवे घोटाळ्याप्रकरणी 29 जानेवारीला गुन्हा दाखल झालेला आहे. यात ठेकेदार लोटके हा मुख्य आरोपी असून, अभियंता रोहिदास सातपुते, बाळासाहेब सावळे व लिपिक भरत काळे असे आरोपी आहेत. यातील काळेला गुन्हा दाखल झाल्याच्या दिवशीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर महिना लोटला तरी लोटकेसह सातपुते व सावळे असे तिघेही फरार होते. 

लोकटे हा बुधवारी रात्री नगमध्ये येणार असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. त्यावरून रात्री साडेअकरा वाजता पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या पथकाने त्याला जेरबंद केले. त्याच्याकडून गुन्ह्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे धागेदोरे तपासात हाती लागण्याची शक्यता आहे. यात आणखी कुणाचा समावेश आहे, याचा उलगडाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालयाने लोटकेला 5 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी अभियंता सातपुते व सावळे हे दोघे अद्यापही फरारच आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जही जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. पोलिसांना अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.

सोनटक्के, सारसर, गोसावींची खातेनिहाय चौकशी

नगरविकास विभागाने 7 फेब्रुवारीला दिलेल्या आदेशानुसार आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी पथदिवे घोटाळ्यातील अनियमिततेबाबत अभियंता रोहिदास सातपुते, पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे, लिपिक भरत काळे यांच्यासह शहर अभियंता विलास सोनटक्के, प्रभाग अधिकारी नाना गोसावी, जितेंद्र सारसर यांची खातेनिहाय चौकशी प्रस्तावित केली आहे. शासनाचे सेवानिवृत्त उपसचिव बी. के. उसारे यांच्यामार्फत ही चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.