Wed, Jul 24, 2019 12:23होमपेज › Ahamadnagar › बनावट सोने देऊन लुटण्याचा डाव फसला

बनावट सोने देऊन लुटण्याचा डाव फसला

Published On: Jun 29 2018 12:10AM | Last Updated: Jun 28 2018 10:24PMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

श्रीगोंदा शहरापासून जवळ असणार्‍या घायपातवाडीच्या जंगलात पाच लाखात एक किलो सोने देण्याच्या नावाखाली मुंबईतील एका धनिकाला गंडा घालण्यासाठी दोन महिलांनी व्यूहरचना केली होती. मात्र, श्रीगोंदा पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही लूट होता होता राहिली. श्रीगोंदा पोलिसांनी या महिलांना अटक केली असून, त्याच्याकडून पितळी अंगठ्या व  दोन मोबाइल जप्त केले आहेत. ही घटना बुधवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी पोलिसांनी सारिका नितीन चव्हाण (वय 22), वैशाली रामदास चव्हाण (रा. गुंडेगाव, ता. नगर)या ठकबाजी करणार्‍या महिला आरोपींना अटक केली आहे. इतर पुरुष साथीदार मात्र पळून गेले आहे.

श्रीगोंदा पोलिस फरारी आरोपीचा शोध  घेत असताना घायपतवाडी येथे दोन महिला संशयास्पद फिरताना दिसल्या. त्यावर पोलिसांनी त्यांना  विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता महिलांनी पितळी अंगठ्या, दोन मोबाइल काढून दिले. या महिलांनी मुंबई येथील एका व्यापार्‍याला आमच्याकडे एक किलो सोने असून तुम्हाला पाच लाख रुपयात देण्याचे आमिष दाखवले होते. ठरल्याप्रमाणे मुंबई येथील दोघे श्रीगोंदा येथे आले होते. आरोपी महिला आणि व्यापारी यांची भेट होण्याअगोदरच पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतल्याने ही लूट टळली. ताब्यात घेतलेल्या  महिलांनी आम्ही मुंबईच्या बाबूला पितळी अंगठ्या दाखवून पाच लाख रुपयांना फसविणार असल्याची कबुली दिली. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महावीर जाधव व पोलिस  कॉन्स्टेबल अंकुश ढवळे, प्रकाश वाघ, दादा टाके, रवी जाधव, उत्तम राऊत, अमोल शिंदे, अरविंद जाधव यांनी हा छापा टाकून कारवाई केली.

लुटीची दुसरी घटना 

जळगाव येथील दोघांना 12 एप्रिल रोजी याच ठिकाणी 2 लाख 90 हजार रुपयांना लुटण्यात आले होते. काल पुन्हा त्याच ठिकाणी लुटीची घटना टळली.श्रीगोंदा पोलिसांनी दाखवलेली सतर्कता महत्वाची ठरली. 

मुंबईतील ते दोघे कोण 

मुंबई येथील दोघांना लुटण्याची तयारी करण्यात आली होती, मात्र  पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने लूट टळली. मुंबई येथील ते दोघे कोण, कुणाच्या माध्यमातून ते इथे आले होते याचा शोध श्रीगोंदा पोलिस घेत आहेत.