Thu, Jul 16, 2020 08:58होमपेज › Ahamadnagar › कर्जत शहरात पाळला कडकडीत बंद

कर्जत शहरात पाळला कडकडीत बंद

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 20 2018 11:00PMकर्जत : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने कर्जतमध्ये मोर्चा काढून कडकडीत बंद पाळण्यात आला. रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले. विशेष म्हणजे, या बंदमध्ये कर्जतमधील सर्व शाळा, महाविद्यालये देखील सहभागी झाली होती. 19 जुलैच्या रात्रीपासूनच सकल मराठा समाजाच्या युवकांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनही सुरू केले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे काल विविध ठिकाणी ठोक मोर्चे काढण्यात येणार होते. त्यानुसार येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. गुरुवारी रात्री सोशल मीडियावर कर्जत शहर बंद ठेवण्याची हाक सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व व्यापारी बंधूंना देण्यात आली. त्याला सर्व व्यापारी बांधवानी पाठिंबा देत काल सर्व दुकाने दिवसभर बंद ठेवली. शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच शहरातील हॉटेल्स, कापड व्यापार, सराफ व्यापार व इतर सर्व दुकाने बंद होती. सकाळी शहरातील काही शाळा, महाविद्यालये नियमितपणे सुरु झाली होती. मात्र 9 वाजता सर्व विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले.काही शाळा भरल्याच नाहीत. 

शेकडो युवक रस्त्यावर 

सकाळी 9 वाजता शहरामधून हातात भगवे झेंडे घेऊन शेकडो युवक आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत रस्त्यावर उतरले. शहरामधून भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलनात रुपांतर झाले.  सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राजेंद्र फाळके, बाळासाहेब साळुंके, राजेंद्र गुंड, दीपक भोसले, नानासाहेब धांडे, अ‍ॅड. धंनजय रानमाळ, बळीराम धांडे, विजय तोरडमल, राहुल नवले, अमृत काळदाते, ऋषिकेश धांडे, नीलेश तनपुरे, अ‍ॅड. जगताप, महेश शिंदे, सचिन पोटरे, नितीन धांडे, दीपक शिंदे, काकासाहेब तापकीर, नितीन तोरडमल, प्रसाद कानगुडे, विठ्ठल पिसाळ, बंटी यादव, विजय घालमे, तात्या सुद्रिक, बिभीषण खोसे, दत्तात्रय भोसले आदींसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.  

पालकमंत्र्यांना कर्जत बंदी

रास्ता रोको आंदोलनप्रसंगी अनेकांची भाषणे झाली. राजेंद्र फाळके म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यास भाजप सरकार आणि मुख्यमंत्र्यांचा विरोध आहे. त्यामुळेच आरक्षण मिळत नाही. मराठा समाजाने राज्यात 58 मोर्चे आरक्षणाच्या मागणीसाठी काढले. मात्र गेंड्याची कातडी असलेल्या या सरकारला व त्यांच्या मंत्र्यांवर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. ज्या प्रमाणे आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करण्यापासून रोखण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे धाकटी पंढरी असलेल्या कर्जतला कामिका एकादशीला गोदड महाराजांची रथ यात्रा असते. त्या दिवशी सकल मराठा समाज जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना समाधीची पूजा करु देणार नाहीत, असा इशारा फाळके यांनी दिला. 

बाळासाहेब साळुंके म्हणाले, भाजप सरकारने मराठा समाजाला फक्त झुलवत ठेवले. वारंवार मागणी करूनही आरक्षण दिले जात नाही. आमच्या सहनशक्तीचा अंत सरकारने पाहू नये. शांतपणे आरक्षण मागणारा समाज चिडला, तर सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल. प्रविण घुले म्हणाले, या सरकारला आरक्षण द्यावेच लागेल. नाही दिले तर समाज गप्प बसणार नाही. सचिन पोटरे म्हणाले, आरक्षण आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच.यावेळी बळीराम धांडे, ऋषिकेश धांडे, गजेंद्र यादव यांच्यासह अनेक युवक आणि मुलींचे भाषणे यावेळी झाली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन धनंजय राणे यांनी केले. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, तहसीलदार किरण सावंत आणि पोलिस निरिक्षक राजेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक वैभव महांगरे व शहादेव पालवे यांनी बंदोबस्त ठेवला होता. त्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.