Thu, Aug 22, 2019 04:23होमपेज › Ahamadnagar › पाटपाण्याच्या संघर्षाची सीमा सुटली

पाटपाण्याच्या संघर्षाची सीमा सुटली

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 07 2018 10:56PMशेवगाव : रमेश चौधरी

अधिकारी मुळा पाटपाण्याचा लिलाव करीत असल्याने नियोजनाअभावी अंतिम भागातील क्षेत्र पाण्यापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे खरीप पिके हातून गेली आहेत. हक्काच्या पाटपाण्यासाठी संघर्ष करण्याची सीमा आता सुटली असून पाण्याच्या संकटाने शेतकर्‍यांचा अंत झाला आहे.

अमरापूर मुळा पाटबंधारे उपविभागातंर्गत अमरापूर शाखा ही पाटपाण्याच्या अंतिम भागात आहे. अमरापूर फलकेवाडी, वरुर, भगूर, आव्हाणे, बर्‍हाणपूर, दिंडेवाडी, वडुले, साकेगाव, चितळी, पाडळी, सुसरे आदी लाभार्थी गावातील 4 हजार 540 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली कागोदपत्री ओलिताखाली आहे. प्रत्यक्षात मात्र चार्‍या नादुरुस्ती अभावी आता साधारण हजार ते बाराशे हेक्टर क्षेत्रालाच पाणी येण्याची  शाश्‍वती आहे. इतर क्षेत्र कमांडच्या नावाखाली शासनाच्या योजनेतून बाजूला जात आहे.

प्रत्येक वर्षी आवर्तन सुटले की, या भागावर अन्याय होत आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून पाण्यासाठी सतत संघर्ष करता करता या भागातील लाभार्थी आता थकले असून आणखी किती दिवस हा संघर्ष करावा लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे. टेल टू हेड भरणे करावे असा आदेश काढला जात असतानाही वरच्या भागाला झुकते माप दिले जाते. महिनाभराच्या आवर्तन कालावधीत त्यांच्या पिकाचे तीन-चार वेळा भरणे होऊनही अंतिम भाग पाटण्यासाठी तिष्ठत राहतो. मायनर, सबमायनर फॉलला गेल्या काही वर्षापासून कुठेही लोखंडी गेट अस्तित्वात राहिलेले नाहीत. त्यामुळे मनाला वाटेल तेव्हा पाणी लुटले जात आहे.

वर्षानुवर्षे पर्जन्यमान कमी होत आहे. खरिपाला तीन आवर्तने मिळून नियोजन केल्यास या भागातील काही क्षेत्र उत्पादित होऊ शकते. परंतु अंतिम भाग मुळा पाटपाणी लाभार्थी म्हणून नावालाच आहे. या पाण्यातून राजकारणही बाजूला राहिले नाही. पाणी आले की श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागते. मात्र सत्य परिस्थिती पाहण्यासाठी शेतकर्‍यांच्या बांधावर कोणीही जात नाही. अधिकारी मागणीनुसार सर्व क्षेत्र भिजल्याचा अहवाल देतात आणिी पाण्यातून कमाई करतात. आतातर तर पत्रकबाजीवर पाटपाणी नाचत आहे.

गेल्या एक महिन्यापासून मुळेचे आवर्तन सुरू आहे. अंतिम भागाचे काही क्षेत्र भिजले. त्यासाठी जेवढे पाणी लागले, त्यापेक्षा कित्तेक पट पाणी वाया गेले. सतत फोडाफोडीने अधूनमधून बंद होणार्‍या पाण्यामुळे शेतकर्‍यांनी पाटावरच मुक्काम ठोकला. त्यात काही क्षेत्र भिजले. काही कोरडेच राहिले. यंदा निसर्गाचा कोप झाला आहे. हातातले खरीप पीक गेल्यात जमा आहे. त्यात पाटपाण्याचे नियोजन नाही. आलेल्या पाण्याचा लिलाव होत आहे. त्यातून शेततळी भरली गेली आहेत. मिळालेल्या दामावरून ओलिताचे माप दिले गेले. परिणामी पिकाच्या अपेक्षा सुटल्या आहेत. पाटाला पाणी दिसत असताना अनेक क्षेत्रातील तहानलेल्या पिकाला पाण्याचा टिपूस आला नाही. अशी दुर्दशा झाली असून पाटपाण्याने अधिकारी मात्र पाणीदार झाले आहेत.