Thu, Apr 25, 2019 15:31होमपेज › Ahamadnagar › न्यायालयात गुदमरतोय लोकांचा जीव!

न्यायालयात गुदमरतोय लोकांचा जीव!

Published On: Jun 29 2018 12:10AM | Last Updated: Jun 28 2018 10:28PMनेवासा : कैलास शिंदे 

एकाच न्यायालयाच्या इमारतीत तीन वेगवेगळ्या न्यायालयांचे कामकाज चालत असल्यामुळे पक्षकार व वकिलांना अनेक गैरसोईना सामोरे जावे लागत आहे. सन 2004 मध्ये बांधण्यात आलेल्या न्यायालयाच्या नव्या इमारतीत आता लोकांचा जीव गुदमरु लागला आहे.

नेवासा शहरातील प्रवरा नदीलगतची जुनी न्यायालयीन इमारत अपुरी पडू लागल्याने शहराच्या बाहेर सन 2004 मध्ये नवीन इमारतीत कनिष्ठ दिवाणी न्यायालयाचे कामकाज सुरू झाले. त्यावेळच्या गरजेनुसार या इमारतीत तीन न्यायालयांचे कामकाज चालत होते. समोरील मोकळा परिसरही मोठा वाटत होता. परंतु सन 2011 मध्ये वरिष्ठ दिवाणी न्यायालयाला परवानगी मिळाल्यानंतर काही दिवस कामकाज जुन्या इमारतीत चालले. परंतु वकिलांसाठी ते गैरसोयोईचे वाटू लागल्याने ते कामकाजही नवीन न्यायालय इमारतीमध्ये सुरू करण्यात आले. परिणामी नवीन इमारतीत चार ‘कोर्ट हॉल’ झाले. सन 2014 मध्ये नेवासा येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालयाला परवानगी मिळाली.

त्याचे कामकाज जुन्या इमारतीत सुरू करण्यात आले. परंतु तेही गैरसोयीचे वाटू लागल्याने अतिरिक्‍त जिल्हा न्यायालयाचे कामकाजही नवीन इमारतीत सुरू करण्यात आले. त्यामुळे नवीन इमारतीत पाच ‘कोर्ट हॉल’ तयार करण्यात आले. त्यासाठी वकील संघाची इमारत रिकामी करण्यात आली. दरम्यान, पक्षकारांची संख्या वाढू लागली. वकिलांचीही संख्या वाढली.सध्या नेवासा कोर्टात 250 वकील आहेत. दिवसभरात कोर्टात दीड ते दोन हजार पक्षकारांची वर्दळ असते. परिसर दोन चाकी व चार चाकींनी पूर्ण भरलेला असतो.

कनिष्ठ व वरिष्ठ दिवाणी न्यायालयात जवळपास 6 हजार मुख्य प्रकरणे प्रलंबित आहेत. जिल्हा न्यायालयातही दीड हजाराच्या जवळपास प्रकरणे प्रलंबित आहेत. किरकोळ प्रकरणे निराळीच. जिल्हा न्यायालयासाठी दोन सरकारी वकील, कनिष्ठ न्यायालयात तीन तर वरिष्ठ दिवाणी न्यायालयात एक असे पाच सरकारी वकील आहेत. त्यांच्या कार्यालयासाठी तापुरत्या सोयी करण्यात आल्या आहेत. स्टाफला बसण्यासाठीही जागा नाही. एका टेबलावर दोन जणांना काम करावे लागते. प्रलंबित दाव्यांची व दाखल प्रकरणांची संख्या पाहता आणखी दोन ‘कोर्ट हॉल’ तयार करण्याचे काम सुरू आहे. या इमारतीत ‘कोर्ट हॉल’ समोरच वकिलांचे कारकून बसत होते. आता त्यांची बाहेर व्यवस्था झाली आहे. पावसाळ्यामध्ये त्यांचेही हाल होण्याची शक्यता आहे. परंतु तरीही एकाच कनिष्ठ दिवाणी न्यायालय इमारतीत वेगवेगळ्या तीन न्यायालयांचे सात ‘कोर्ट हॉल’मध्ये कामकाज चालणार आहे. सध्या पाच ‘कोर्ट हॉल’मध्ये कामकाज चालत असताना पक्षकार व वकील एकमेकांना घासून चालत आहेत. सकाळी तर मोठी गर्दी असते त्यामुळे जीव गुदमरल्याचा अनुभव प्राप्त होतो. त्यात मूलभूत सुविधांची गैरसोय आहे.

सध्या कामकाज चालत असलेल्या या इमारतीच्या पूर्वेस जिल्हा न्यायालयाच्या इमारतीसाठी जागा ताब्यात देण्यात आलेली आहे. इमारतीचा प्रस्तावही तयार आहे.शासनाकडून निधी कधी मंजूर होतो, ते अनिश्चित आहे. वकील संघाचे कामकाज प्रभारी अध्यक्षांकडे आहे. त्यामुळे इमारतीचा पाठपुरावा होताना दिसत नाही. प्रशासकीय स्तरावर लालफितीचा अडथळा आहे. लोकप्रधिनिधींचेही वकील व पक्षकारांच्या होणार्‍या गैरसोईकडे दुर्लक्ष दिसते. अशा परिस्थितीत होत असलेला कोंडमारा सहन करण्याशिवाय पक्षकार व वकिलांना पर्याय राहिलेला नाही.दरम्यान न्यायालयाच्या आवारात सध्या महिला व पुरूषांसाठी  स्वच्छतागृह, अंपगांसाठी सुविधा असे बांधकाम होत आहे. 

वकिलांनाही अडचणी आहेत : वाखुरे

कोर्ट कामकाज करतांना विविध जागेअभावी अडचणी येतात. वकिलांना कोर्ट हॉलमध्ये बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. पक्षकारांनाही वकिलांसारखी बसण्यास अडचण येते. मुलभूत सुविधा नाहीत, असे अ‍ॅड. के. एच. वाखुरे यांनी सांगितले.

पक्षकारांची देखील तारांबळ!

नेवासा तालुक्यातून कोर्टाच्या कामांसाठी  वेगवेगळ्या गावांमधून पक्षकार नेवासा न्यायालयात येतात. ही संख्या मोठी असते. बसण्यासाठी पक्षकारांचीही चांगलीच तारांबळ नेहमी उडत असते, असे पक्षकार रामचंद्र पर्‍हे यांनी सांगितले.