Fri, Jul 19, 2019 20:32होमपेज › Ahamadnagar › ज्ञानप्राप्तीसाठी ग्रंथालयेच अंत्यत उपयुक्त 

ज्ञानप्राप्तीसाठी ग्रंथालयेच अंत्यत उपयुक्त 

Published On: Jul 12 2018 1:39AM | Last Updated: Jul 11 2018 10:39PMकोपरगाव : प्रतिनिधी

वेद पुराणात ज्ञान भांडार आहे. सध्याच्या युगात प्रत्येकाने भाषा लिपी हे जाणून घेतली पाहिजे. आज प्रगत तंत्रज्ञानाने फेसबुक, गुगल,   ट्विटर,  व्हॉटस अ‍ॅपच्या रुपाने जग कितीही जवळ आले असले तरी ज्ञान अवगत करण्यासाठी ग्रंथालयातच जावे लागेल. तेव्हाच सरस्वती प्राप्त होते, असे प्रतिपादन लेखक साहित्यिक डॉ. देवदत्त पटनायक यांनी केले. 

येथील सोमय्या विद्याविहार संचलित शारदा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुमारे अडीच कोटी रूपये खर्चून स्पनिश झुरिक व स्विर्त्झलँड येथील ग्रंथालयांचा अभ्यास करून अध्यक्ष समीर शांतीलाल सोमैया यांच्या मातोश्री माया यांच्या नावे व्होल्टच्या तत्त्वावर आर्किटेक्ट समीप आरोडा यांनी विना खांबी पर्यावरण पूरक 145 फूट लांबीची 25 फूट उंचीची व सहा हजार स्क्वेअर फूट जागेवर केवळ चार इंची तीन विटांच्या थरावर एक वर्षात राज्यातील एकमेव ग्रंथालय उभारले आहे.  बावीस हजार पुस्तकांचा संच येथे उपलब्ध आहे. त्याचे उद्घाटन समीर सोमय्या यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी डॉ. पटनायक बोलत होते. 

याप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, गोदावरी बायोरिफायनरिजचे संचालक एस. मोहन, रेनबो स्कूलचे संस्थापक लहानुभाऊ नागरे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, उद्योजक कैलास ठोळे, आर्किटेक्ट समीप आरोडा, माजी प्राचार्य के. एस. गुरूसिद्धप्पा, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, कामगार नेते मनोहर शिंदे, लिलाबेन मीरा जाधव, कविता कर्वे, अश्‍विनी शेळके उपस्थित होते.

पटनायक म्हणाले की, पुस्तकाचे ज्ञान अवगत करण्यासाठी सरस्वती महत्त्वाची आहे. जो जीवनात घाबरतो. त्याला सरस्वती कधीच प्राप्त होत नाही. आपल्या मनातील भीती घालविण्यासाठी विद्या आणि गितेसारखे दुसरे ज्ञान नाही. बाराशे वर्षांपूर्वी शंकराचार्यांनी शारदा लिपी शोधून तिला ज्ञानदेवतेची आई मानले तिचा वास जेथे आहे, त्याला विद्या विहार संबोधले जाते.

समीर सोमैया म्हणाले की, आपली कन्या गायत्री ही इयत्ता नववीत शिकत असताना तिला वाचनाची आवड लागली. तिने दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच अवांतर दोनशे पुस्तकांचे वाचन केले. तिच्या प्रेरणेतून जगातील अत्याधुनिक ग्रंथालय कोपरगावसारख्या ग्रामीण भागात उभारावे, ही कल्पना तीन वर्षांपूर्वी रुजली त्याचे विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी लोकार्पण करताना अत्यानंद होत आहे. कोेपरगावचे जेठाभाई पटेल यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ या ग्रंथालयास एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी दिली त्याबद्दल त्यांचा समीर सोमैया यांनी सत्कार केला. 

प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एल. वाकचौरे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन महेश व सई या विद्यार्थ्यांनी, तर आभार सोमय्या विद्याविहारचे सचिव माजी लेफ्टनंट जनरल जसबीर सिंग यांनी मानले. कार्यक्रमासाठी शारदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी विशेष सहकार्य घेतले. या वेळी विद्यार्थ्यांनी गणेश स्तवन सांस्कृतिक गीत व पुस्तक नाटिका सादर केली.