होमपेज › Ahamadnagar › भ्रष्टाचारमुक्‍तीची सरकारची इच्छा नाही : अण्णा हजारे 

भ्रष्टाचारमुक्‍तीची सरकारची इच्छा नाही : अण्णा हजारे 

Published On: May 27 2018 1:16AM | Last Updated: May 26 2018 11:29PMपारनेर : प्रतिनिधी   

केंद्रातील मोदी सरकारने चार वर्षांतील कामगिरीची मोठी जाहिरातबाजी केली आहे. मात्र, निवडणुकीच्या आधी व प्रचारादरम्यान भ्रष्टाचारमुक्‍त भारताचे दिलेले आश्‍वासन पाळलेले नाही. चार वर्षांत लोकपाल व लोकायुक्‍तांची नियुक्‍ती करण्यात आली नाही. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्‍त भारत उभा करण्याची सरकारची इच्छा नाही, असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. 

दिल्‍लीतील आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या आश्‍वासनांप्रमाणे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसह लोकपाल व लोकायुक्‍तांची नियुक्‍ती न झाल्यास येत्या 2 ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धीत आंदोलन सुरू करण्याचा इशारा हजारे यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना पाठविलेल्या स्मरणपत्रात दिला आहे. सात दिवसांच्या आंदोलनानंतर देण्यात आलेल्या आश्‍वासनांप्रमाणे दोन महिन्यांत काय कार्यवाही झाली, याची माहिती मिळण्यासाठी  दोनदा स्मरणपत्रे पाठविण्यात आली. परंतु त्याचे उत्तर मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा समरणपत्र देत असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे. 

मोदी सरकारच्या चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हजारे यांनी राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांना हे स्मरणपत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, दिल्‍लीतील रामलिला मैदानावर केलेल्या आंदोलनानंतर कृषि मूल्य आयोगास स्वायतत्ता देण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणे, किमान उत्पादन मूल्य निर्धारित करताना 50 टक्के जास्त दर निश्‍चित करणे,  शेतीवर अवलंबून असणार्‍या साठ वर्षांवरील वृद्धांना दरमहा 5 हजार रूपये मानधन देणे, कृषि उत्पादनासाठी आवश्यक यांत्रिक अवजारांवरील जीएसटी माफ करणे, याबाबत निर्णय घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र, त्यावर अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल, लोकायुक्‍त नियुक्‍ती महत्त्वाची आहे. मात्र, त्याबाबतही सरकारकडून निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्‍त भारत उभा करण्याची सरकारची इच्छा दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.