Wed, Jan 16, 2019 23:45होमपेज › Ahamadnagar › कचरा संकलन अखेर सुरू!

कचरा संकलन अखेर सुरू!

Published On: May 12 2018 1:23AM | Last Updated: May 12 2018 12:42AMनगर : प्रतिनिधी

कचरा संकलनासाठी मनपाला पुरविण्यात येणार्‍या ट्रॅक्टर व वाहन चालकांच्या थकीत देयकांपोटी ठेकेदार संस्थेला 35 लाख रुपये अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे ठेकेदार संस्थेने कालपासून (दि.11) काम सुरु केले असून तीन दिवसांनंतर कचरा संकलनाचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला आहे.मनपाकडे अपुरे कर्मचारी असल्याने खासगी तत्त्वावर कंत्राटदाराकडून मजूर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. देयके थकल्याने त्यांनी काम बंद केले होते. त्या पाठोपाठ वाहन चालक व वाहने पुरविणार्‍या संस्थेनेही काम बंद केले होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून काम बंद असल्याने शहरात कचर्‍याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. महापौर सुरेखा कदम, सभापती बाबासाहेब वाकळे यांनी मागील दोन दिवस या प्रश्‍नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाने निधी उपलब्ध असतांनाही आर्थिक अडचणींचे कारण पुढे करत केवळ 20 लाख रुपयेच देण्याची तयारी दर्शविली. ठेकेदाराने थकीत असलेल्या 90 लाखांचय देयकांपोटी किमान 50 टक्के देयके अदा करावीत, अशी मागणी केली होती.

त्यामुळे काम ठप्पच होते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रश्‍नी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी मनपा अधिकार्‍यांकडून याबाबत आढावा घेतला. गेल्या महिनाभरात कोट्यवधींची वसुली झालेली असतांनाही मनपाच्या अधिकार्‍यांनी महापौरांसह जिल्हाधिकार्‍यांसमोर आर्थिक अडचणीचे कारण पुढे करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर काल सकाळी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे व नगरसेवक मुदस्सर शेख यांनी जिल्हाधिकारी द्विवेदी यांची भेट घेतली. मनपाच्या सध्याच्या वसुलीची व निधी उपलब्धतेची वस्तुस्थिती त्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी पुन्हा अधिकारी व ठेकेदाराशी चर्चा करुन थकीत बिलांपोटी 35 लाख रुपये अदा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. ठेकेदारानेही यावर संमती दर्शविल्यावर जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ कचरा संकलनाचे काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कामही सुरु करण्यात आले आहे.

अत्यावश्यक सेवांना प्राधान्य द्यावे!

सवलतीमुळे वसुलीचे प्रमाण वाढले आहे. मनपाकडे कोट्यवधी रुपये उपलब्ध झाले आहेत. एप्रिल महिन्यात तब्बल 18 कोटींची वसुली झाली आहे. त्यानंतर मागील 10 दिवसांतही कोट्यवधी रुपये मनपाच्या खात्यात जमा झाले आहेत. यातून घनकचरा, आरोग्य विभागाच्या अत्यावश्यक सेवांपोटी थकीत असलेली देयके व पाणी योजनेची बिले प्राधान्याने अदा करण्याची गरज आहे. मात्र, सध्याचे चित्र पाहता प्रशासन व पदाधिकार्‍यांना ठेकेदारांची देयके अदा करण्यातच अधिक रस असल्याचे दिसून येत आहे.