Mon, May 20, 2019 20:05होमपेज › Ahamadnagar › ऑईल चोरांची टोळी पकडली

ऑईल चोरांची टोळी पकडली

Published On: Jan 13 2018 1:10AM | Last Updated: Jan 12 2018 11:54PM

बुकमार्क करा
संगमनेर : प्रतिनिधी

माल वाहतूक करणार्‍या टँकरमधून ऑईलची चोरी करुन, ते काळ्या बाजारात विकणार्‍या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी काल (दि.12)पहाटे नऊजणांना अटक करून, आठ टँकरसह जवळपास 58 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. संगमनेरच्या औद्योगिक वसाहतीत ही कारवाई करण्यात आली.

पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर औद्योगिक वसाहतीत उपाध्याय यांच्या रिकाम्या जागेत काही इसम टँकरमधून फर्निश ऑईलची चोरी करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार सहायक पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे, सहायक पोलिस निरीक्षक शंकरसिंह राजपूत, उपनिरीक्षक पंकज निकम या वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिस पथक सोबत घेत काल (दि.12) पहाटे संगमनेर औद्योगिक वसाहतीमधील  रिकाम्या प्लॉटमध्ये छापा टाकला. 

यावेळी या परिसरात आठ टँकर उभे असल्याचे पोलिसांना आढळून आले. यावेळी नऊ आरोपी त्यांच्या हाती लागले. अंधाराचा फायदा घेऊन 6 टँकरचालक घटनास्थळावरुन पसार होण्यात यशस्वी झाले. नऊजणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी आठ टँकर व त्यातील मोठ्या प्रमाणात असलेले फर्निश ऑईल, असा एकूण 58 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोलिस नाईक विजय पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मासुकअली हस्मुल्लाखान (रा.अमन पॅलेस, आयडियल मार्केट, ठाणे), मेहता आलम अदिल अहंमद सिद्धीकी (रा.भाटपारा, उत्तरप्रदेश), सद्दाम हुसैन फारुकखान (रा.पाराबजार, उत्तरप्रदेश), करीम अब्दुल हरुन साहील (रा.बलियापूर, उत्तरप्रदेश), शहबाज इकलाख हुसेन (रा.बुढानगर, उत्तरप्रदेश), इर्शाद जुबेर चौधरी (रा.वडाळा, मुंबई), साकीरअली बहादूरअली शेख (रा.झंझार, उत्तरप्रदेश)  यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

या टँकरमधून मोहंमद युसुफ मकबुल हुसेन खान (रा.शिवडी कोळीवाडा, मुंबई) याच्या मदतीने आबीद (रा.धुळे, पूर्ण नाव समजू शकले नाही) याच्या सांगण्यावरुन टँकरमधून फर्निश ऑईलची चोरी करुन, संगनमताने विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यातआले.