Sun, May 26, 2019 17:26होमपेज › Ahamadnagar › कुंपण रानडुकरांचे, अडकले बछडे

कुंपण रानडुकरांचे, अडकले बछडे

Published On: Aug 07 2018 12:58AM | Last Updated: Aug 06 2018 11:59PMपारनेर ः प्रतिनिधी 

तालुक्यातील जामगांव शिवारात रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याने त्यांना पकडण्यासाठी शेतकर्‍याने शेतीभोवती घातलेल्या कुंपणात बिबट्याचे दोन बछडे अडकले. पिंजरा लावूनही बिबट्या वनविभागास हुलकावणी देत असतानाच आढळलेल्या दोन बछड्यांमुळे वनविभागाने आता मादीचा शोध सुरू केला आहे. या बछड्यांना निसर्गात मुक्‍त करण्यात आले आहे. 

पारनेर शहरात कुलट तसेच तराळ वस्तीवर दोन बछड्यांसह बिबट्या वास्तव्यास होता. पिंजरा लावूनही बिबट्या किंवा बछडे वन विभागास हुलकावणी देत होते. आता बछडे आढळून आल्याने बिबट्याच्या वास्तव्याला दुजोरा मिळाला आहे.

जामगाव शिवारात कवडेश्‍वर डोंगर परिसरात राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांची शेती असून शेतीभोवती घालेल्या तारेच्या कुंपणालगत दोन्ही बिबटे आढळून आले. माळी यांचे बंधू दशरथ माळी यांनी वनविभागास त्याची माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी बछडे ताब्यात घेतले व त्यांना निसर्गात सोडून दिले. या परिसरात गेल्या महिनाभरापासून रान डुकरांनीही धुमाकूळ घातला असून शेतातील वाटाणा पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतक-यांनी पिकांभोवती तारांचे कुंपण घातले आहे. या कुंपणामध्ये दोन्ही बछडे अडकले होते. त्यांना त्यातून बाहेर काढण्यात येऊन जवळच्या निसर्गात सोडून देण्यात आले. 

बछडे मिळून आल्याने याच भागात मादी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे बछडे तेथून जवळच सोडण्यात आल्याचे वनविभागाने सांगीतले. या परिसरापासून लांबच्या अंतरावर बछडे सोडण्यात आले असते तर चवताळून मादीचा नागरीकांवर हल्‍ला होण्याची भिती होती. सध्या वाचलेल्या वाटाण्याच्या पिकांची तोडणी सुरू असून बिबट्याच्या दर्शनामुळे शेतकरी वर्गात मात्र घबराटीचे वातारण आहे.दरम्यान, वनविभागाने बिबट्यासह रानटी डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी जामगावच्या नागरीकांनी केली आहे.