Mon, Dec 17, 2018 16:14होमपेज › Ahamadnagar › ‘सीआयडी’ला म्हणणे सादर करण्यासाठी दिली मुदतवाढ

‘सीआयडी’ला म्हणणे सादर करण्यासाठी दिली मुदतवाढ

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 20 2018 10:34PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झालेल्या आरोपींना ‘सीआयडी’ने दोषारोपत्राच्या प्रती देताना खुनाच्या व्हिडिओची सीडी व काही जबाबांच्या प्रती दिलेल्या नाहीत. याप्रकरणी म्हणणे सादर करण्यासाठी ‘सीआयडी’ने काल (दि. 20) न्यायालयात मुदतवाढ मागितली. न्यायालयाने 1 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.

13 जुलै रोजी केडगाव हत्याकांडाचे तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक अरुणकुमार सपकाळ यांनी 8 आरोपींना दोषारोपपत्राच्या प्रती दिल्या होत्या. त्यात खुनाचा व्हिडिओ व काही साक्षीदारांच्या जबाबाच्या प्रती दिलेल्या नव्हत्या. त्यामुळे आरोपींनी न्यायालयात अर्ज करून खुनाचा व्हिडिओ व राहिलेल्या जबाबाच्या प्रती देण्याची मागणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोनल पाटील यांच्याकडे केली होती. त्यावर न्यायालयाने ‘सीआयडी’ला 20 जुलैपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. 

शुक्रवारी (दि. 20) ‘सीआयडी’ने म्हणणे सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली. केडगाव हत्याकांडावर विधीमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. त्यामुळे तपासी अधिकारी नागपूरला होते. म्हणून म्हणणे सादर करण्यासाठी मुदत देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने ‘सीआयडी’ला म्हणणे सादर करण्यासाठी 1 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.काही जबाबांच्या प्रती न देणे व खुनाचा व्हिडिओ न देणे यामागे नेमके कारण काय, असा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. यावर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग काय म्हणणे मांडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कोतकरच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी

आरोपी भानुदास कोतकर याने केडगाव हत्याकांडाच्या गुन्ह्यात जामीन मंजूर व्हावा, यासाठी अर्ज केला आहे. त्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि. 24) जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. अर्जावर आरोपीच्यावतीने अजून म्हणणे सादर करण्यात आलेले नाही.