Sun, Jul 21, 2019 16:46
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › ‘सीने’तील पक्‍की अतिक्रमणेही रडारवर!

‘सीने’तील पक्‍की अतिक्रमणेही रडारवर!

Published On: May 18 2018 1:13AM | Last Updated: May 17 2018 11:03PMनगर : प्रतिनिधी

सीना नदी पात्रातील अतिक्रमणांवर कारवाई संदर्भात जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रशासनाने 7 दिवसांची नोटीस जारी केली आहे. त्यानुसार 25 मेपासून नदी पात्रातील अतिक्रमणांवर कारवाई सुरु होणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनीही काल (दि.17) नदी पात्रातील अतिक्रमणांच्या परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, हद्दनिश्‍चितीवेळी निदर्शनास आलेल्या पक्क्या अतिक्रमणांवरही या मोहिमेत कारवाई होणार असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

महापालिका, महसूल, पाटबंधारे, भूमिअभिलेख व पोलिस अशा सर्व विभागांची संयुक्‍त बैठक बुधवारी (दि.16) जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पार पडली होती. त्यात जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी अतिक्रमणधारकांना 7 दिवसांची अंतिम मुदत देऊन कारवाई सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काल मनपाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. शहराच्या हद्दीत असलेल्या 14 किलोमीटरच्या नदी पात्रात नागापूर, बोल्हेगाव ते बुरुडगाव रोडपर्यंत विविध स्वरुपांची अतिक्रमणे करण्यात आली आहेत. भराव टाकणे, विट भट्ट्या चालविणे, डेब्रीज टाकणे, अतिक्रमित बांधकाम करणे, व्यावसायिक वापर करणे, शेती पिकविणे, नदीच्या पाण्याचा प्रवाह अडवून ते पाणी शेतीसाठी वापरणे, विद्युत पंप बसविणे, गाळपेर क्षेत्राचा दुरुपयोग करणे आदी विविध प्रकारच्या अतिक्रमणांमुळे नदीचे पात्र अरुंद झाले आहे. मागील वर्षी मनपा व इतर शासकीय विभागांनी नदी पात्राची प्रत्यक्ष हद्दनिश्‍चिती करुन पक्क्या खुणा, सिमेंट काँक्रिटचे खांब उभे केले होते. त्यानुसार नदी पात्रात असलेली सर्व प्रकारची अतिक्रमणे नोटीस प्रसिध्द झाल्यापासून 7 दिवसांत काढून घ्यावीत. अन्यथा मुदतीनंतर कारवाई करण्यात येईल व परिणामांची सर्व जबाबदारी संबंधितांचीच असेल, असा इशारा मनपाने नोटिसीद्वारे दिला आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी काल स्वतः नदी पात्राची पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला. अतिक्रमणांची माहिती घेतल्यानंतर मुदतीनंतर नियोजनानुसार कारवाई पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच पक्की अतिक्रमणे, बांधकामे असलेल्या ठिकाणची हद्दनिश्‍चिती रखडली असून ती कारवाईवेळी पूर्ण करुन देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी भूमिअभिलेख विभागाला दिल्या आहेत.

टिळक रस्त्यालगतच्या अतिक्रमणांचे काय?

सीना नदीपात्राच्या दोन्ही बाजूंनी सुमारे 75 टक्के भाग अतिक्रमणांनी वेढला आहे. यात वीटभट्ट्या, शेतीसह काहींनी पक्की बांधकामेही केली आहे. नवीन टिळक रस्त्यालगत नदी पात्रात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाल्याचे हद्दनिश्‍चितीवेळी आढळून आले आहे. विशेष म्हणजे पूरप्रवण क्षेत्रात व नदीपात्रातील ‘ले-आऊट’ही मनपाकडून मंजूर असल्याचे खासगीत बोलले जाते. त्यामुळे मनपाकडून प्रत्यक्ष कारवाई सुरु झाल्यानंतर या अतिक्रमणांवर कारवाई होणार का? याकडे लक्ष लागले आहे.