Thu, Jul 16, 2020 09:48होमपेज › Ahamadnagar › वीजवाहक तारा अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू

वीजवाहक तारा अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू

Published On: Sep 10 2018 1:15AM | Last Updated: Sep 09 2018 11:18PMपाथर्डी : शहर प्रतिनिधी

वीजवाहक तारा अंगावर पडल्याने एका तरूणासह म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तालुक्यातील लांडकवाडी येथे रविवारी (दि.9) सकाळी सात वाजता ही घटना घडली. ऐन पोळा सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सोन्याबापू अर्जून कावळे (वय22) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. ते नेहमी प्रमाणे सकाळी म्हशीचे दूध काढत होते. यावेळी अचानक विजेच्या तारा तुटून त्यांच्यासह म्हशीच्या अंगावर पडल्या. विजेचा जोरदार धक्का बसल्याने सोन्याबापू यांनी आरडाओरडा केला. परंतु, जोरदार झटका बसल्याने सोन्याबापू व म्हशीचा जागीच मृत्यू झाला. जवळच असलेले त्यांचे वडील अर्जून कावळे हे वाचविण्यासाठी गेले असता, त्यांनाही विजेचा धक्का बसून किरकोळ दुखापत झाली आहे. वीजवाहक तार तुटल्याचे लक्षात आल्यानंतर  ग्रामस्थांनी  रोहित्रातून वीजप्रवाह बंद केला. त्यानंतर तारांच्या मधून सोन्याबापू व म्हशीची सुटका केली. परंतु, तोपर्यंत दोघांचाही प्राण गेला होता. 

विजेच्या समस्यांबाबत वेळोवेळी लेखी तक्रार करूनही महावितरणच्या अधिकारी, कर्मचार्‍यांकडून लक्ष दिले जात नाही. अशा प्रकारच्या तीन घटना यापूर्वी गावात घडल्या असून, त्यात शेतकर्‍यांची जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. रविवारी एका निष्पाप युवकाला आपला जीव गमवावा लागला. याला वीज वितरण कंपनीचे संबंधित अधिकारी, कर्मचारी जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जून शिरसाट, पंचायत समितीचे सदस्य सुनील ओव्हळ यांच्यासह ग्रामस्थांनी केली. 

दरम्यान महावितरणचे कोणतेही अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांचा रोष वाढला होता. जोपर्यंत हलगर्जीपणा करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. मात्र, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी मृताचे नातेवाईक व ग्रामस्थांची भेट घेऊन संबंधितांवर कायदेशीर करील, असे आश्वासन दिल्यानंतर अंत्यविधी करण्यात आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.