Sun, Mar 24, 2019 12:25होमपेज › Ahamadnagar › ‘व्हॉटसअ‍ॅप’ नगरीत सुशिक्षित युजर्स भरकटले

‘व्हॉटसअ‍ॅप’ नगरीत सुशिक्षित युजर्स भरकटले

Published On: Jul 07 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 10:37PMश्रीरामपूर : प्रतिनिधी 

‘व्हॉटसअ‍ॅप’च्या अंधेरी नगरीत भरकटलेल्या अनेक भोळ्याभाबड्या तरुणाईच्या मनात जाती-धर्मात तेढ निर्माण करणारे विचार बिंबवून समाजात अराजकता निर्माण करणार्‍या लांडग्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ऐरवी विचारांची देवाण-घेवाण करणार्‍या या व्हॉटसअ‍ॅपचा आता सर्वांत वेगात अफवा पसरवण्याचे साधन म्हणून दुरपयोग होत आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉटसअ‍ॅपवर पोर्‍हं पळविणारी टोळीच्या मेसेजची फॉरवर्ड ‘आवई’ निरपराध लोकांच्या जीवावर बेतणारी असल्याने जिल्हा पोलिस प्रशासनाने व्हॉटसअ‍ॅपग्रुपवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नेटकर्‍यांमध्ये आज तरुणाई मोठ्या प्रमाणात गुरफटली आहे. यामध्ये फेसबुक पाठोपाठ व्हॉटसअ‍ॅप युझरची संख्याही लक्षणीय आहे. त्यात ग्रामीण भागातही या अ‍ॅपने ‘वेड’ लावल्याचे चित्र आहे. यामधून अनेक समविचारी व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार होऊ लागले. त्यातून विचारांची आदान-प्रदान आणि ताज्या घडामोडी, घटनांची माहिती मिळत असल्याने या माध्यमावर चटकन विश्‍वास बसू लागला. एकीकडे चांगल्या विचारांची माणसे या माध्यमाचा चांगला वापर करत असतानाच दुसरीकडे विघ्नसंतोषी लोकांकडून या माध्यमाद्वारे खोट्या बातम्या पसरवून दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचे प्रकार घडले आहेत.

त्यात ग्रुपवर आलेला मेसेज अन्य ग्रुपवर सर्वांत अगोदर फॉरवर्ड करण्याच्या प्रयत्नात हा खोटा मेसेज क्षणात गावोगावी पोहचून अराजकता निर्माण होण्याचा धोका असतो. असे अनेकदा घडलेही आहे. अचानकचे बंद, आंदोलने, रास्तारोको, टँकर जाळला, शेतकर्‍यांवर लाठीमार, विद्यार्थ्यांना मारहाण अशा ग्रामीण घटनांबरोबरच धार्मिक आक्षेपार्ह विधान टाकून माथी भटकावणार्‍या अनेक खोट्या बातम्याही ग्रुपवर टाकल्या जातात व कोणतीही शहानिशा न करता केवळ आपल्या ग्रुपमधील लोकांनाही ही ‘ब्रेकींग’ देण्यासाठी ती पुढे ढकलली जाते. मात्र अशा अनेक ग्रुपमध्ये ती खोटी बातमी पुढे रेटल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. 

गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडींकडे नजर टाकल्यास व्हॉटसअप जीवघेणे ठरत असल्याचेच दिसत आहे. अनेक ठिकाणी आक्षेपार्ह विधान ग्रुपवर टाकल्याने अ‍ॅडमिनला जेलवारी करावी लागली. नगर जिल्ह्यातही कोतवाली पोलिस ठाण्यात असा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच राहुरी तालुक्यातील गुहा येथेही नुकतेच जातीय तेढ निर्माण झाले होते. व्हॉटसअ‍ॅपच्या ग्रुपवरून काढून टाकल्याने सोनईच्या चौघांनी विळद घाटामध्ये एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटनाही घडली आहे. अशा अनेक प्रमुख घटनांमधून अ‍ॅडमिन तसेच पोस्ट टाकणार्‍याला पोलिसांनी अटक व नोटीसाही बजावल्या आहेत. मात्र तरीही खोडसाळ लोक आजही खोट्या बातम्या पसरवत आहेत व सुशिक्षत युझर्स  त्यामध्ये भरकटत आहेत.

जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी आल्याची अशीच एक अफवा सुरू आहे. यामध्ये वास्तवता नसली तरी व्हॉटसअ‍ॅपच्या अंधेरी नगरीत वावरणार्‍या सुशिक्षित युझरचा यावर विश्‍वास बसत आहे. त्यामुळे शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी आणि अन्य काही भागांतही अनेक निरपराध लोकांना मारहाण झाल्याचे समजते. त्यामुळे ‘व्हॉटसअ‍ॅप’ हा प्रशासनाची डोकेदुखी वाढवणारा एक ‘क्रिमिनल’ ठरत आहे. अशीच अफवा पसरवणार्‍या श्रीरामपूर येथील एका तरूणासही अटक करण्यात आली होती.  मुले पळवल्याच्या अफवेतून धुळ्यात 5 निरपराधांची हत्या झाली आहे. अशाप्रकारे देशात 20 जणांचे मारहाण झाल्याने नाहक बळी गेले. त्यामुळे ‘वरदान’ समजले जाणारे ‘व्हॉटसअप’चे वेगवान माध्यम सध्या मात्र ‘शाप’ ठरू पाहत आहे.