Mon, May 25, 2020 15:50होमपेज › Ahamadnagar › पिसाळलेल्या कुत्र्याचा २२ जणांना चावा!

पिसाळलेल्या कुत्र्याचा २२ जणांना चावा!

Published On: May 16 2019 2:19AM | Last Updated: May 17 2019 1:45AM
श्रीगोंदा : प्रतिनिधी 

तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील 22  ग्रामस्थांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. चावा घेतलेल्यांपैकी चौघांवर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून, गावासह परिसरात दहशत पसरली आहे. टाकळी कडेवळीत येथे ऐन यात्रेच्या काळात  पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारपासून तीन दिवस धुमाकूळ घातला आहे. 22 ग्रामस्थांना आजपर्यंत चावा घेतला आहे. त्यामध्ये लहान मुलांसह मोठ्यांचाही समावेश आहे. कुत्र्याच्या दहशतीमुळे  ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत. गावात फिरण्यास अघोषित संचारबंदी लागू झाली आहे.

चावा घेतल्यानंतर आढळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतल्यानंतर रुग्णांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. नगर येथे लस दिल्यानंतर चौघांना अ‍ॅलर्जी आली. परिणामी त्यांना पुणे ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत पुढील उपचार करण्यातयेणार आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत निर्माण झाली आहे. या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध 

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर म्हणाले, टाकळी कडेवळीत येथील प्रकारानंतर आरोग्य विभाग सतर्क आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर जी प्राथमिक लस घेणे आवश्यक असते ती लस आढळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. ज्यांना या कुत्र्याने चावा घेतला असेल त्यांनी तत्काळ आढळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्यावी.