Tue, Mar 26, 2019 01:35होमपेज › Ahamadnagar › नगर जिल्ह्याचे विभाजन करा

नगर जिल्ह्याचे विभाजन करा

Published On: Mar 16 2018 12:44AM | Last Updated: Mar 16 2018 12:44AMनगर : प्रतिनिधी

क्षेत्रफळ व लोकसंख्येने मोठा असलेल्या नगर जिल्ह्याचे तत्काळ विभाजन करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी गुरुवारी विधिमंडळाच्या पायर्‍यांवर बसून ठिय्या आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात निवेदनही देण्यात आले.

जिल्ह्याचे लवकरच विभाजन केले जाईल, असे सूतोवाच काही दिवसांपूर्वी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कले होते. त्यानंतर नगरच्या दौर्‍यावर आलेल्या महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी त्यास दुजोरा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना गुरुवारी सकाळी विधीमंडळाच्या समोर जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार एकत्र आले. ‘नगर जिल्ह्याचे विभाजन तात्काळ झालेच पाहिजे’, असा फलक झळकावत आणि पायर्‍यांवर बसून त्यांनी आंदोलन सुरू केले. आंदोलनात आ. स्नेहलता कोल्हे, आ. मोनिका राजळे, आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. विजय औटी, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. संग्राम जगताप आदी सहभागी झाले होते. पालकमंत्री शिंदे यांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावली.

प्रशासकीय कारभाराच्या सोयीसाठी राज्यातील मोठ्या जिल्ह्यांचे विभगाजन करण्यासाठी राज्य सरकारने एक अभ्यास समिती नेमलेली आहे. या समितीने आपला अहवालही सरकारला सादर केलेला आहे. नगर जिल्हा क्षेत्रफळाने मोठा असून, लोकसंख्याही 46 लाखांच्या घरात गेलेली आहे. पालकमंत्री शिंदे यांनी लवकरच जिल्ह्याचे विभाजन करण्याचे सूतोवाच जानेवारी महिन्यात केले होते. त्यानंतर मागील महिन्यात नगर दौर्‍यावर आलेल्या महसूलमंत्री पाटील यांनीही  त्यास दुजोरा दिला होता. त्यानंतर जिल्हा विभाजनाच्या चर्चेला पुन्हा उधाण आलेले आहे

. उत्तर नगर जिल्ह्यांच्या मुख्यालयावरून पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. जिल्हा विभाजनाबरोबरच काही तालुक्यांचे विभाजन करून नवीन तालुके करण्याची मागणीही जोर धरू लागलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच सर्वपक्षीय आमदारांनी जिल्हा विभाजन करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना या आमदारांकडून काल यासंदर्भात निवेदनही देण्यात आले. त्यामुळे या मागणीबाबत शासनाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागून राहणार आहे.