Mon, Apr 22, 2019 12:41होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्याचे विभाजन करणारच

जिल्ह्याचे विभाजन करणारच

Published On: Feb 13 2018 2:05AM | Last Updated: Feb 13 2018 12:24AMसंगमनेर : तालुका/ शहर प्रतिनिधी

मागील आघाडी सरकारमुळेच जिल्हा विभाजनाचा प्रश्‍न रखडला असल्याचा गौप्यस्फोट करून नगर जिल्ह्यात आघाडी सरकारच्या काळात तीन मंत्री असतानाही त्यांना जिल्हा विभाजन करता आले नाही. मात्र, सध्याच्या युती सरकारच्या काळात जिल्ह्यातून एकमेव मंत्री असल्यामुळे मी या जिल्ह्याचे विभाजन करणारच, असे सूतोवाच पालकमंत्री राम शिंदे यांनी केला.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर येथे शेतकरी मेळाव्यात ना. शिंदे बोलत होते. यावेळी भाजपचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषदेतील गटनेते जालिंदर वाकचौरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन  आहेर, भाजपचे तालुकाध्यक्ष  काशिनाथ पावसे, अशोक इथापे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दिलीप साळगट, अकोले तालुका भाजप अध्यक्ष सीताराम भांगरे उपस्थित होते. 

ना. शिंदे  म्हणाले की, नगर जिल्ह्याचे विभाजन या अगोदरच होणे गरजेचे होते. या जिल्ह्याला तीन मंत्री लाभले. मात्र, त्यांना 25 वर्षांत या जिल्ह्याचे विभाजन करता आले नाही. मात्र, आता मी जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला असून, नगर जिल्ह्याचे विभाजन करणारच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

शिवसेना तालुकाप्रमुख जनार्दन आहेर म्हणाले, यापूर्वीच्या मंत्री महोदयांना काही करता आले नाही. मात्र, घारगाव पोलिस ठाण्याची  इमारत 6 कोटी निधी, बोटा वीज उपकेंद्र, अकलापूर देवस्थानला ‘क’ वर्गातून निधी पालकमंत्री यांनीच दिला आहे. यापुढे तर पर्यटन विकासात समावेश करून 1 टीएमसी धरण व्हावे, जिल्ह्याचे विभाजन होऊन संगमनेर जिल्हा व्हावा, अशी मागणी त्यांनी करतानाच माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका करताना ज्यांना अकोले विधानसभेत आमदार, पंचायत समिती सदस्य व जोर्वे येथील उपसरपंच निवडून आला आला नाही, त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करू नये, तर महसूलमंत्री असताना जिल्ह्याचे विभाजन करता आले नाही. मात्र, पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा विभाजनाचा शिवधनुष्य उचललेले असून ते बाण मारणारच तर भविष्यात शिवसेना-भाजप युती होऊन विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकवू, या असेही ते म्हणाले. 

जालिंदर वाकचौरे यांनी जिल्ह्याचे विभाजन होऊन राजूर व घारगाव तालुका व्हावा, अशी मागणी केली. अशोक भांगरे यांनी मतांच्या पेट्या भरून गेली 40 वर्षे त्यांची फसवणूकच केली असून, आजही त्यांच्याकडे मतांचा जोगवा मागितला जात आहे.  यावेळी भाऊसाहेब वाकचौरे यांनीही मनोगत व्यक्त केले.