Mon, Aug 19, 2019 13:44होमपेज › Ahamadnagar › ग्रामस्थ-शिक्षण संस्थेतील वाद कायम

ग्रामस्थ-शिक्षण संस्थेतील वाद कायम

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 21 2018 10:41PMपारनेर : प्रतिनिधी

विद्यार्थिनीची छेड काढल्यामुळे बदली करण्यात आलेल्या शिक्षकाची पुन्हा त्याच शाळेत नियुक्‍ती केल्याने हरेश्‍वर शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी आंधळे यांच्याविरोधात कोहकडीच्या ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. संस्थेच्या निषेधार्थ गेल्या पाच दिवसांपासून शाळेस ठोकलेले टाळे गुरूवारी उघडण्यात आले परंतु पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविणेच पसंत केल्याने शिक्षण संस्था व ग्रामस्थांमधील वाद कायम आहे. 

सुमारे दहा वर्षांपूर्वी कोहकडीच्या रत्नेश्‍वर विद्यालयातील एका विद्यार्थिनीची शिक्षकाने छेड काढली होती. ही गोष्ट विद्यार्थिनीने तिच्या पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी शिक्षकास जाब विचारत शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली. ग्रामस्थांनीही शिक्षकावर कारवाई झाल्याशिवाय विद्यालय सुरू न करण्याचा ग्रामसभेत पवित्रा घेतल्यानंतर कर्जुले हर्या येथील हरेश्‍वर शिक्षण संस्थेने सबंधित शिक्षकाची रत्नेश्‍वर विद्यालयातून बदली केली. सामंजस्याने वाद मिटविण्यात आल्याने शिक्षकावर बदली व्यतिरिक्‍त इतर कायदेशीर कारवाई करण्यात आली नव्हती. 

नविन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर हरेश्‍वर शिक्षण संस्थेने शिक्षकांच्या बदल्या करताना कोहकडीच्या रत्नेश्‍वर विद्यालयातील मुख्याध्यापक वगळता सर्व शिक्षकांच्या बदल्या करण्याचा पराक्रम केला. बदल्यानंतर या विद्यालयात नव्या शिक्षकांच्या नियुक्त्या करताना संस्थेचे सचिव शिवाजी आंधळे यांनी दहा वर्षापूर्वी विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी बदली करण्यात आलेल्या त्या शिक्षकाची पुन्हा कोहकडीच्याच विद्यालयात नियुक्‍ती करण्याचा धक्‍कादायक निर्णय घेतला. 5 जून रोजी बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर 6 जून रोजी त्या शिक्षकासह इतर शिक्षक शाळेत रूजू होण्यासाठी आले. तो शिक्षक पुन्हा शाळेत आल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये पुन्हा संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्या शिक्षकाव्यतिरिक्‍त दुसर्‍या शिक्षकाची नियुक्‍ती करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ व संस्थेचे सचिव शिवाजी आंधळे यांच्यात संघर्ष सुरू आहे.

सचिव आंधळे यांचा उद्दामपणा

या संदर्भात सचिव शिवाजी आंधळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिशय बेजबाबदार उत्‍तरे दिली. त्या शिक्षकाने मुलीची छेड काढली होती याचे तुमच्याकडे पुरावे आहेत का, शिक्षकाने गैरवर्तन केले होते हे सिद्ध करून दाखविले पाहिजे, गेल्या 10-12 वर्षांचे मला काहीच आठवत नाही, अशा शिक्षकाची बदली करायची नाही अशी घटनेत तरतूद आहे का? असे प्रतिप्रश्‍न त्यांनी केले. तेव्हा त्यावेळी त्या शिक्षकाची बदली करण्याची कारणे आणि पुरावे तुमच्याकडे असतीलच, असे विचारले असता, तुम्हाला माहिती दिली पाहिजे असे आमच्यावर बर्डन आहे का, असा सवाल करत आंधळे यांनी भ्रमणभाष बंद केला.