Fri, Apr 26, 2019 15:58होमपेज › Ahamadnagar › बाबांचा भक्त शिर्डीत आजही असुरक्षित

बाबांचा भक्त शिर्डीत आजही असुरक्षित

Published On: Jan 25 2018 1:03AM | Last Updated: Jan 25 2018 1:03AMशिर्डी : प्रतिनिधी

‘एक साई का भरोसा, एक साई का सहारा’, म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून साईनगरीची वारी करणारे असंख्य भाविक आजही शिर्डीच्या साईबाबांचा आशिर्वाद घेण्यासाठी येत असतात. मात्र, अशा भक्तदासांच्या सुरक्षेबाबत साईबाबा संस्थांन प्राधान्य कधी देणार असा सवाल भक्तांमधून उपस्थित केला जात आहे. 

तत्कालिन पोलिस अधीक्षकांनी दहशतवादाचा धोका लक्षात घेऊन साई मंदिरास 107 पोलिस कर्मचारी व तीन अधिकारी नेमले होते. त्याचबरोबर साई संस्थानची 137 कायमस्वरूपी कर्मचारी तर रोजंदारीवर 308 तर आणखी एका एजन्सीच्या 388 कर्मचारी मिळून 1040 सुरक्षा कर्मचारी भक्तांच्या सुरक्षततेसाठी तैनात असतात. त्यातील 107 पोलिस कर्मचारी हे केवळ मंदिर परिसर सुरक्षेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर संस्थानचे सुरक्षा कर्मचारी व एजन्सीचे कर्मचारी प्रसादालय, भक्तनिवास, शैक्षणिक संकुल, रुग्णालय येथे नेमण्यात आले आहे. 

या सुरक्षा रक्षकांच्या मानधनापोटी संस्थान वर्षाकाठी सुमारे 12 कोटींचा खर्च करीत आहे.असे असले तरी आजही परप्रांतातून आलेले पाकीटमार व गुन्हेगारी क्षेत्राशी निगडीत असलेले गुन्हेगार मोठ्या प्रमाणात शिर्डीत वास्तव्यास असलेले अनेक गुन्ह्यातून समोर आले आहे. त्याचा त्रास भाविकांना व शिर्डीतील ग्रामस्थांना ही सहन करावा लागत आहे. त्यासाठी आवश्यक असणारी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे भिजत घोंगडे गेल्या चार वर्षांपासून संस्थान दरबारी आहे. याकडे मात्र विश्वस्त मंडळ व वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष का करत आहे? याचे इंगित अजूनही काही कळालेले नाही. 

शिर्डीतील गुन्हेगारी थांबविण्यास सीसीटीव्ही ही अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे. याचे परिणाम विविध विभागांना भोगावे लागत आहे. काही वर्षापूर्वी साईनाथ रुग्णालयातून एक अर्भक चोरी गेले होते. तसेच मंदिरात दररोज भाविकांची पाकिटमारी होत असते. सोनसाखळी चोरही डल्ला मारत असतात. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी एका तळीरामाने शैक्षणिक संकुलात धुडगूस घातला होता. तर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिंनीची छेडछाडीचे प्रकरणे घडली आहेत. 

साई मंदिरात एक अधिकारी व ग्रामस्थांमध्ये हमरीतुमरी झाली होती. या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्यामुळे हे प्रकरण पडद्याआड गेले होते. त्यामुळे संस्थानच्या भक्तनिवास, प्रसादालय, मंदिर परिसर, रुग्णालय आदी विभागात सीसीटीव्हीचे आवश्यकता आहे. त्यामुळे संस्थान एक प्रकारे गुन्हेगारीला खतपाणी घातले जात आहे का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.गुन्हेगारीवर वचक आणण्यासाठी प्रशासनाकडे संबंधीत विभागाने वारंवार मागणी केलेली आहे. मात्र, शताब्दी सोहळ्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी गरज आहे.