Sat, Jul 20, 2019 08:33होमपेज › Ahamadnagar › संत निळोबारायांच्या पालखीचे प्रस्थान

संत निळोबारायांच्या पालखीचे प्रस्थान

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 08 2018 10:15PMपारनेर : प्रतिनिधी    

ज्ञानोबा, तुकोबा, निळोबांच्या गजरात संत परंपरेतील शेवटचे संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्याने काल (दि.8) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास निळोबारायांचे समाधीस्थळ असलेल्या पिंपळनेर येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.सकाळी 11.30 वाजता निळोबारायांचे वंशज गोपळबुवा व विठ्ठल मकाशिर यांनी निळोबारायांच्या पादुकांचे निळोबांचे वास्तव्य असलेल्या घरात पूजन केले. पादुका पालखीमध्ये ठेवण्यात आल्यानंतर त्या समाधीस्थळी नेण्यात आल्या. तेथे देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पादुकांचे स्वागत करण्यात येउन समाधी तसेच पादुकांचे विधीवत पूजन करण्यात आले. दुपारी तीन वाजता नारायण महाराज जाधव यांच्या प्रस्थानाच्या कीर्तनास प्रारंभ झाला. दुपारी सव्वाचार वाजता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे समाधीस्थळी आगमन झाले. त्यांच्या हस्ते पालखीचे, तर विष्णू महाराज पारनेरकर यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. माजी मंत्री बबनराव पाचपुते, सुप्रिया झावरे, प्रशांत गायकवाड, वसंत चेडे, देवस्थानचे कार्याध्यक्ष अशोक सावंत, सुरेश पठारे, दादासाहेब पठारे, प्रांताधिकारी गोविंद दाणेज, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्यासह हजारो वारकरी यावेळी उपस्थित होते. सकाळी नउ वाजल्यापासूनच विविध गावांच्या दिंडया पिंपळनेरमध्ये दाखल होण्यास प्रारंभ झाला होता. प्रस्थानापर्यंत 31 दिंडयांनी हजेरी लावली होती. तर प्रवासादरम्यान आणखी 20 दिंड्या सहभागी होणार आहेत. 

यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, या पालखी साहळ्यानिमित्ताने जिल्ह्याचा स्वाभिमान पंढरपूरपर्यंत पोहचला पाहिजे. यासाठी इतर पालखी सोहळ्यांप्रमाणे सर्व शासकीय सुविधा या  सोहळ्यासही देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.    कीर्तनानंतर हजारे, विष्णू महाराज पारनेरकर यांच्या हस्ते तसेच ना. शिंदे, पाचपुते यांच्या उपस्थितीत वीणा पूजन करण्यात आले. संत नामदेव महाराज यांचे वंशज रामदास महाराज यांनी प्रस्थाचा पहिला अभंग घेतल्यानंतर सुरेश पठारे यांच्या हस्ते आरती होऊन सव्वासहा वाजता पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. ग्रामप्रदक्षिणा घालून पालखी सोहळा राळेगणसिद्धीकडे मार्गस्थ झाला. पालखी मार्गावर ठिकठिकाणी सडा-रांगोळ्या घालण्यात येऊन उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत होते. 

वारकर्‍यांनो तंबाखू सोडा : हजारे 

वारीमध्ये चालणारे अनेक वारकरी तंबाखू मळताना दिसतात. कोणतेही व्यसन आरोग्यासाठी चांगले नसून, पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला जाताना तंबाखू खाणे चांगले नाही. यापुढे वारकर्‍यांनी तंबाखूस तिलांजली देऊन आपले चारित्र शुद्ध ठेवण्याचे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यावेळी बोलताना केले.