Thu, Apr 25, 2019 21:26होमपेज › Ahamadnagar › पूजा सकटच्या मारेकर्‍यांना अटक करण्याची मागणी

पूजा सकटच्या मारेकर्‍यांना अटक करण्याची मागणी

Published On: May 05 2018 12:47AM | Last Updated: May 04 2018 11:16PMकर्जत : प्रतिनिधी 

भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची एकमेव साक्षीदार असलेली पूजा सुरेश सकट हिची हत्या करणार्‍या नराधमांना  अटक करावी, या मागणीसाठी काल (दि. 4) कर्जत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदला व्यापारी बांधवांनी पाठिंबा दिला. 

सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद होते. दलित संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार किरण सावंत यांना निवेदन देण्यात आले. विजयालक्ष्मी पवार या विद्यार्थिनीच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय भिसे, विकास रंधवे, विनोद पवार, राजेंद्र पवार, सतीश पवार, चंदन भिसे, संजय भैलुमे, दत्ता कदम, लहू लोंढे, मीनाक्षी उकीरडे, शोभा वसंत सकट, पोलिस उपनिरीक्षक सहदेव पालवे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.

निवेदनात म्हटले आहे की, भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीची पूजा सकट ही प्रत्यक्ष साक्षिदार होती. या दंगलीत पूजा सकट यांचे हॉटेल व घर दंगेखोरांनी जाळून टाकले. या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विलास वेदपाठक व गणेश वेदपाठक यांना अटक झाली आहे. मात्र इतर 9 जण फरारी आहेत. दोन महिन्यांपूर्वी पूजाचा भाऊ जयदीप याने शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पूजाची हत्या करण्यात आली. या आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.  

यावेळी सचिन घोडके म्हणाले, बहुजन समाजाने आज एकत्र येण्याची गरज आहे. मीनाक्षी उकिरडे यांनी भीमा कोरेगाव दंगलीतील सर्व हल्लेखोरांना ताताडीने अटक झाली पाहिजे. शोभा सकट यांनीही मनोगत व्यक्त केले. भिसे यांनी आभार मानले. आंदोलनास आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे यांनी पाठिंबा दिला.तहसीलदार सावंत निवदेन स्वीकारण्यास लवकर बाहेर न आल्याने आंदोलकांना उन्हात ताटकळत राहावे लागले, याचा सतीश पवार यांनी निषेध केला.