Thu, Nov 14, 2019 06:03होमपेज › Ahamadnagar › शौचालयाच्या टाकीत पडून मजुराचा मृत्यू

शौचालयाच्या टाकीत पडून मजुराचा मृत्यू

Published On: Jul 12 2019 1:42AM | Last Updated: Jul 12 2019 12:35AM
बेलापूर : प्रतिनिधी

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे शौचालयाच्या टाकीतील  मैला साफ करण्यासाठी आलेल्या एका मुजराचा टाकीत पडून गुदमुरून मृत्यू झाला, तर दुसरा मजूर अत्यवस्थ आहे. गुरुवारी (दि.11) सकाळी 11 च्या सुमारास पुजारी वस्तीवर ही घटना घडली.

ज्ञानेश्वर पोपट गांगुर्डे (वय 35 रा. बेलापूर बु.) असे मृताचे, तर रवी राजू बागडे असे अत्यवस्थ असलेल्या मजुराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बेलापूर खुर्द येथील पुजारी वस्तीवरील सुकदेव पुजारी यांच्या घरी शौचालयाच्या टाकीतील मैला काढण्याचे काम ज्ञानेश्वर गांगुर्डे व रवी बागडे यांना देण्यात आले होते. गुरुवारी सकाळी अकरा वाजता हे दोघे मैला काढण्यासाठी घरामागील शौचालयाच्या टाकीजवळ गेले. पाच फूट खोल असलेली टाकी पूर्णपणे भरलेली होती. टाकीवरील झाकण बाजूला करताना ज्ञानेश्वर  गांगुर्डे हा तोल जाऊन टाकीमध्ये पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्न करत असताना, रवी बागडे हा देखील टाकीत पडला. ही घटना समजताच येथील नागरिक घटनास्थळाकडे धावले.

दोघांनाही दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांंना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी यातील ज्ञानेश्वर गांगुर्डे  यास मृत घोषित केले. रवि बागडे हा अत्यवस्थ असून, त्याच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. परंतु, प्रकृती आणखी खालावल्याने त्यास प्रवरानगर येथील रुग्णालयात हलविल्यात आले आहे. 
या घटनेमुळे बेलापूर परिसरात  शोककळा परसली आहे. दरम्यान  दोघांच्या घरची परिस्थिती अतिशय हालाखीची आहे. याबाबत बेलापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूरचे हवालदार अतुल लोटके पुढील तपास करीत आहेत