Sun, Jul 21, 2019 01:40होमपेज › Ahamadnagar › रतनवाडीत चिमुरडीचा खड्ड्यात पडून मृत्यू

रतनवाडीत चिमुरडीचा खड्ड्यात पडून मृत्यू

Published On: Mar 15 2018 1:17AM | Last Updated: Mar 15 2018 12:15AMभंडारदरा : वार्ताहर

नवीन घराच्या बांधकामासाठी पाणी साठवलेल्या खड्ड्यात पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रतनवाडी येथे घडली. 

अकोले तालुक्यातील रतनवाडी या गावात किसन दुंदा कोकतरे यांनी आपल्या घराचे बांधकाम सुरू केले होते. बांधकामसाठी आवश्यक पाण्यासाठी त्यांनी बाजूलाच तीन ते चार फुटांचा खड्डा खोदून त्यामध्ये पाणी साठवून ठेवले होते. नेहमी प्रमाणे बांधकाम सुरू होते. मजूर सर्व घरचेच होते. किसन कोकतरे यांना दीड वर्षाची एकुलती एक ईश्‍वरी नावाची चिमुकली मुलगी. ती नुकतीच थोडेथोडे चालायला शिकल्याने तेथेच खेळत होती. आई, वडील, काका काम करत असल्यामुळे त्यांचे ईश्‍वरीकडे दुर्लक्ष झाले व खेळताखेळता चिमुकली ईश्‍वरी पाण्याच्या खड्ड्यात पडली.

थोडावेळ झाल्यावर आईला ईश्‍वरी दिसेना म्हणून तीन आवाज दिला, पण ईश्‍वरी काही दिसली नाही. त्यामुळे सर्वांची तिचा शोध घेतला. अखेर दुपारी दीड वाजेच्या सुमारास ईश्‍वरीच्या काकांचे लक्ष पाण्याचा खड्ड्याकडे गेले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता व चिमुकल्या ईश्‍वरीने जगाचा निरोप घेतला होता. 

ही घटना आईला समजताच आक्रोश पसरला. एकुलत्या एक असणार्‍या लाडक्या ईश्‍वरीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली होती.  दरम्यान, कोकतरे कुटुंबाचे घर बांधण्याचे स्वप्न उराशी असतानाच हा दुर्दैवी आघात झाला.