Thu, Apr 25, 2019 06:22होमपेज › Ahamadnagar › तहसीलदारांसह चौघांविरूद्ध गुन्हा

तहसीलदारांसह चौघांविरूद्ध गुन्हा

Published On: Jan 26 2018 1:23AM | Last Updated: Jan 26 2018 1:23AMकर्जत : प्रतिनिधी

शेतकर्‍याचा ट्रक जाळल्याप्रकरणी म्हणून करमाळ्याचे तहसीलदार संजय पवार यांच्यासह अन्य तिघांवर अखेर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईसाठी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले.

या घटनेबाबत माहिती अशी की,  मंगळवारी (दि. 23) मध्यरात्री 2 च्या सुमारास करपडी बाभूळगाव रस्त्याने माळवदकर वस्तीजवळ रिकामी ट्रक (एमएच 14 डीए  5763) रस्त्याने जात होती. गाडीमध्ये चालक हनुमंत बापू काळे (रा. परिटवाडी, ता. कर्जत) व क्लीनर लखन घोडके (रा. चिलवडी, ता. कर्जत) हे दोघे होते.  ही गाडी बाभूळगाव शिवारात आल्यावर पाठीमागून आलेल्या एका वाहनाने (एमएच22 यु 8677) पुढे येऊन ट्रक थांबविली. गाडीमधून चारजण खाली उतरले. त्यांनी ट्रकमधील दोघांना नावे विचारली. क्लीनर घोडके याने नाव सांगितल्यावर त्याला  शिवीगाळ सुरू केली. यावेळी घाबरून घोडके पळून गेला. 

नंतर चालक हनुमंत काळे याला या चौघांपैकी एकाने, ‘तू मला ओळखतो का, मी करमाळा येथील तहसीलदार संजय पवार आहे. मी आतापर्यंत दोन ट्रक पेटवून दिल्या आहेत’, असे म्हणून कमरेची रिव्हॉल्व्हर काढली. चालक हनुमंत काळे याच्या दिशेने रोखून सांगितले की, लगेच येथून पळ. नाहीतर गोळी घालील. ट्रकसहित जाळून टाकीन. त्यावर काळे घाबरून पळून लांब शेतात जाऊन लपून बसले. त्यानंतर या चौघांनी ट्रकच्या टाकीमधील डिझेल काढून ट्रकवर ओतले आणि उभा ट्रक पेटवून दिला. त्यानंतर ते तेथून निघून गेले. या आगीत 13 लाख रूपये किंमतीचा ट्रक जळून खाक झाला.

त्यानंतर हनुमंत काळे यांनी त्यांचे नातेवाईक अर्जून काळे यांना दूरध्वनीवर सर्व घटना सांगितली. यावर अर्जून काळे यांनी त्यांचे नातेवाईक सरपंच श्याम कानगुडे व राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष नितीन धांडे यांना सर्व वृत्तांत सांगितला. ते सगळे घटनास्थळी आले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. संपूर्ण ट्रक जळून गेला.

शेतकर्‍याचा ट्रक विनाकारण पेटवून दिल्याने परिसरात संतापाची लाट पसरली. सरपंच श्याम कानगुडे व नितीन धांडे आणि इतर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रांताधिकारी, पोलिस उपअधीक्षक व पोलिस निरीक्षकांना यासंदर्भात निवेदन दिले. करमाळा येथील तहसीलदार संजय पवार यांनी काहीही कारण नसताना रस्त्याने जाणारा शेतकर्‍याचा ट्रक अडवून व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ट्रक जाळून कायदा हातात घेतल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच करमाळा तहसीलदारांनी त्यांची हद्द नसलेल्या कर्जत तालुक्यात अनाधिकाराने हे कृत्य केले. हा शेतकर्‍यांवर अन्याय आहे. त्यामुळे तहसीलदार आणि त्यांच्या सोबतच्या तिघांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. 

गुन्हा दाखल होण्याच्या मागणीसाठी कर्जत पोलिस ठाण्यात ग्रामस्थांनी ठिय्या देत 28 जानेवारीला राशीन येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर या प्रकरणी कर्जत पोलिसांनी करमाळ्याचे तहसीलदार संजय पवार आणि अन्य तीन अनोळखी व्यक्तींवर भादंवि कलम 435,323, 504, 506, 427, 34, आर्मअ‍ॅक्ट कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक वसंत भोये पुढील तपास करीत आहेत.