Sun, Jul 21, 2019 16:17
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › पालिकेकडे 4 टन प्लास्टिकसाठा पडून

पालिकेकडे 4 टन प्लास्टिकसाठा पडून

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 10:04PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

श्रीरामपूर नगरपलिकेने 2014 पासून वेळोवेळी कारवाई करीत तब्बल 4  टन प्लास्टिक साठा जमा केला. मात्र, प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतरही या साठ्याची विल्हेवाट लावण्याचा पालिकेला विसरच पडला आहे. त्यामुळे हा प्लास्टिक  साठा पालिकेच्या 2 खोल्यांमध्ये तसाच पडून आहे. दरम्यान, प्लास्टिकच्या माध्यमातून जिल्ह्यात रस्ते निर्मितीचा प्रयोग काही ठिकाणी यशस्वी झाला असतानाही श्रीरामपूर पालिकेने 4 वर्षांत या प्लास्टिकचा वापर रस्त्यासाठी करण्याचा विचारही केला नाही, हे विशेष!  

राज्यात सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतर प्रशासनाकडून प्लास्टिक वापरणार्‍यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले. यापूर्वी 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापरणार्‍यांवर कारवाई करून 50 रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. मात्र, आता प्लास्टिक वापर आढळल्यास 5 हजार रुपये दंड करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात पालिकेमार्फत व ग्रामीण भागात ग्रामपंचायीमार्फत व्यावसायिकांवर कारवाई सुरू आहे. दरम्यान, श्रीरामपूर पालिकेने 2014 पासून शहरातील व्यावसायिकांवर कारवाई करीत 4 टन प्लास्टिक साठा जप्त केला. 65 हजारांची दंडाची रक्कम वसूल केली आहे. पालिकेच्या दोन खोल्यांमध्ये हा प्लास्टिक साठा करण्यात आला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या साठ्याची विल्हेवाट लावणे पालिकेपुढे पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे.

चार वर्षांच्या कालावधीत या प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यात पालिका उदासीन असतानाच या प्लास्टिकचा वापर रस्त्यासाठी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. मात्र, रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराला देण्यात येणारे हे प्लास्टिक रस्त्यासाठीच वापरणार का? याबाबतही प्रश्‍नचिन्हच आहे.दरम्यान, प्लास्टिकची विल्हेवाट हा एक गंभीर प्रश्‍न बनला आहे.  त्यामुळे या प्लास्टिकचा वापर रस्त्यासाठी करणे हा एक पर्याय आहे. यापूर्वी जिल्ह्यात राहुरी नगरपालिकेने  अशाच प्लास्टिकचा वापर रस्त्याच्या कामासाठी करून रस्ता निर्मिती केली आहे.  त्यामुळे श्रीरामपूर पालिका प्लास्टिकच्या साठ्याबाबत कधी निर्णय घेते,  याकडे श्रीरामपूरकरांचे लक्ष लागले आहे.