Mon, Mar 25, 2019 09:10होमपेज › Ahamadnagar › शहर पुन्हा झाले ‘हागणदारी युक्त’!

शहर पुन्हा झाले ‘हागणदारी युक्त’!

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 03 2018 11:18PMनगर : प्रतिनिधी

तत्कालीन आयुक्त दिलीप गावडे यांच्या कारकिर्दीत नगर शहर हागणादारी मुक्त झाल्याच्या करण्यात आलेल्या घोषणेनंतर अवघ्या सहा महिन्यांतच चित्र बदलले आहे. 2017 मध्ये ‘हागणदारी मुक्त’ असलेले शहर मनपा अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे 2018 च्या सुरुवातीला पुन्हा ‘हागणदारी युक्त’ झाल्याचा पथकाचा अहवाल काही महिन्यांपूर्वीच आला आहे. त्यामुळे शासनाच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच (दि.24 ऑगस्ट) शहरात पुन्हा येवून तपासणी केल्याची समोर आले आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध पथकांमार्फत शहरांची तपासणी करण्यात आली होती. यात मनपाने स्वच्छ महाराष्ट्र योजनेतून उभारलेली वैयक्तिक शौचालये, सामुदायिक शौचालये आदींची पाहणी करण्यात आली. शहरात उघड्यावर सुरु असलेली शौच गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून बंदही करण्यात आली होती. त्यामुळे 2017 मध्ये शासनाने नगर शहर हागणादारी मुक्त झाल्याचे घोषित केले होते. मात्र, मनपाच्या प्रयत्नात सातत्य न राहिल्याने मार्च 2018 मध्ये शासनाने केलेल्या तपासणीत महापालिकेचे पितळ उघडले पडले. हागणादारी मुक्त झालेले शहर पुन्हा हागणदारी युक्त झाल्याचा अहवालही या तपासणीनंतर शासनाकडून देण्यात आला. त्यामुळे महापालिकेला पुन्हा एकदा तपासणीला सामोरे जावे लागले.

24 ऑगस्ट रोजी प्रभाग रचना व आरक्षणाची धामधूम सुरु असतांनाच ‘क्युसीआय’च्या पथकाने शहरात येवून तपासणी केल्याचेही समोर आले आहे. मनपा प्रशासनाला ऐनवेळी याची कल्पना देण्यात आली होती. या पथकाला मनपाच्या अधिकार्‍यांनी काही ठराविक परिसर दाखवून उपाययोजना सुरु असल्याचे निदर्शनास आणल्याचे सांगण्यात येत आहे. या तपासणीचा अहवाल अद्याप प्रलंबित असून, येत्या आठवडाभरात हा अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतर शहर हागणदारी मुक्त झाले की हागणदारी युक्तच राहिले, हे समोर येणार आहे.