Sat, Jul 20, 2019 08:35होमपेज › Ahamadnagar › शहराची वाटचाल जातीय वादाच्या दिशेने

शहराची वाटचाल जातीय वादाच्या दिशेने

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 12:27AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घटना पाहता शहराची वाटचाल ही जातीय वादाच्या दिशेने जात असल्याचे निर्दशनास येत आहे. ही बाब तालुक्याच्या दिशेने धोक्याची घंटा असल्याचे प्रतिपादन आ. भाऊसाहेब कांबळे यांनी केले. 

नागरी दलितवस्ती योजनेंतर्गत प्रभाग 13 मधील अर्चना स्क्रॅप सेंटर ते नॉदर्न ब्रँच दहाव्याच्या ओट्यापर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचा प्रारंभ आ. कांबळे व नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बशीरचाचा शेख होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचेे सभापती दीपकराव पटारे, जि. प. सदस्य शरदराव नवले, डॉ. दिलीप शिरसाठ, माजी उपनराध्यक्ष सलीम शेख, नगरसेवक अ‍ॅड. संतोष कांबळे, प्रकाश ढोकणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्षा अर्चना पानसरे, शहराध्यक्ष लकी सेठी आदी उपस्थित होते.

आ. कांबळे म्हणाले की, राजकारणात चांगले काम केले की चांगले फळ मिळते. परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरातील राजकारण वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांचा आदर ठेवण्यास काहीजण विसरत आहेत. महंत रामगिरींच्या मिरवणुकीत महाराजांचे स्वागत करण्यासाठी गेलेल्या महिला नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना धक्‍काबुक्‍की होणे हा निंदणीय प्रकार आहे. 

आदिक या अत्यंत हुशार नगराध्यक्षा आहेत. प्रत्येक काम त्या पारखून करतात. कुठल्याही कामाचे टेंडर देताना त्याच्या दर्जाबाबत कधीही तडजोड करीत नाहीत. त्यामुळे भविष्यात होणारी विकासकामे ही अत्यंत चांगल्या दर्जाची असतील असा ठाम विश्‍वासही त्यांनी केला. शहरातील राजकारणात सध्या फाटाफाटी झाली आहे. त्यामुळे कोणाला कोठे जोडायचे याचे काम सध्या आदिक करीत आहेत. आगामी काळात सर्वकाही आलबेल होऊन श्रीरामपूरकरांना ‘अच्छे दिन’ पाहावयास मिळतील, असा आशावाद आ. कांबळे यांनी व्यक्त केला. 

आदिक म्हणाल्या की, शहरात सध्या ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. कामाचा प्रारंभ केल्यानंतर लगेचच कामालाही प्रारंभ होत आहे. कामांचा दर्जाही अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे. भुयारी गटाराचे कामही प्रगतिपथावर आहे. कालव्यामधून भुयारी गटार जात असल्याने अडचणी येत आहेत. पाटाचे पाण्याचे रोटेशन थांबल्यानंतर कालवा अंडरग्राउंड गटाराचे उर्वरित कामे हाती घेऊन ही योजना लवकरच कार्यान्वित होईल. 

शहराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाल्याने विविध ठिकाणी छोट्या स्वरुपाच्या भाजी मंडई उभारण्यात येणार आहे. यात औषधालयापासून स्वच्छता गृहासारख्या सुविधा निर्माण करून देण्यात येणार आहेत. जेणेकरून नागरिकांचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. यावेळी सलीम शेख, नगरसेवक राजेंद्र पवार, केतन खोरे, लकी सेठी आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. संतोष कांबळे यांनी केले.