होमपेज › Ahamadnagar › गांधींची आगरकरांना धोबीपछाड

गांधींची आगरकरांना धोबीपछाड

Published On: Jan 22 2018 1:26AM | Last Updated: Jan 21 2018 10:52PMनगर : प्रतिनिधी

संघटेत काम करतांना प्रवाहात राहूनच काम करावे लागेल. शहर जिल्हाध्यक्षांना मंडलाध्यक्ष निवडीचे अधिकार असून याबाबत त्यांचा निर्णय अंतिम असेल, असे स्पष्ट करत खा. दिलीप गांधी यांनी निवड केलेल्या केडगाव व भिंगार येथील मंडलाध्यक्ष निवडीवर पक्षाचे निरीक्षक व संघटन सरचिटणीस किशोर काळकर यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती सरचिटणीस गौतम दीक्षित यांनी दिली. दरम्यान, निरीक्षकांनी केलेल्या स्पष्टीकरणामुळे खा. गांधी गटाने आगरकर गटाला धोबीपछाड दिल्याचे चित्र आहे.

पक्ष निरीक्षक काळकर यांच्या उपस्थितीत काल (दि.21) भाजप कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष खा. गांधी, उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी, बाबासाहेब वाकळे, मालन ढोणे, महेश तवले, माजी शहराध्यक्ष सुनील रामदासी, श्रीकांत छिंदम, किशोर बोरा, गौतम दीक्षित, जगन्नाथ निंबाळकर आदी उपस्थित होते. बैठकीत संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बूथ रचनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. मागील काही महिन्यांपासून चिघळलेल्या मंडलाध्यक्ष निवडीबाबतही बैठकीत चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गांधी गटाकडून निवडण्यात आलेल्या मंडलाध्यक्षांच्या निवडीला स्थगिती दिल्यामुळे मंडलाध्यक्ष कोण? असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

त्यावर किशोर काळकर यांनी मंडलाध्यक्ष निवडीबाबत स्पष्टीकरण देतांना शहर जिल्हाध्यक्षांना या निवडीचे अधिकार असल्याचे व त्यांनी केलेल्या केडगाव (शरद ठुबे) व भिंगार (शिवाजी दहिहंडे) मंडलाध्यक्षांच्या निवडी कायम असल्याचे यावेळी स्पष्ट केले. ठुबे, दहिहंडे यांच्यासह मध्य शहरचे अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांचा सत्कारही त्यांनी केला. मंडलाध्यक्ष निवडीच्या वादाबाबत काळकर यांनी नाराज गटातील कार्यकर्त्यांशीही चर्चा केल्याचे व त्यांना प्रवाहात राहूनच पक्षाचे काम करण्याच्या सूचना दिल्याचे दीक्षित यांनी सांगितले. दरम्यान, भिंगार व केडगाव मंडलाध्यक्ष निवडीवर शिक्कामोर्तब झाल्यामुळे माजी नगराध्यक्ष अभय आगरकर गटाला खा. गांधी गटाने धोबीपछाड दिल्याचे चित्र आहे. येत्या काळात सावेडी मंडलाध्यक्षांचीही निवड केली जाणार असून नवीन कार्यकारिणीही जाहीर केली जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोडींगचे प्रशिक्षण!

भाजपाच्या बैठकीवेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्वच्छता दूत अंजली देवकर-वल्लाकट्टी यांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोडींचे प्रशिक्षण दिले. स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असेही यावेळी सांगण्यात आले. बैठकीस उपस्थित असलेल्या सुमारे 100 ते 150 कार्यकर्त्यांकडून स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करुन घेण्यात आल्याचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी सांगितले.