Tue, Jul 16, 2019 11:38होमपेज › Ahamadnagar › रस्त्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टकण्याचा इशारा

रस्त्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टकण्याचा इशारा

Published On: May 12 2018 1:23AM | Last Updated: May 11 2018 11:40PMनेवासा : प्रतिनिधी

नेवासा परिसरातील मुकिंदपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अनेक वर्षांपासून या भागातील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा रस्ता खराब आहे. गेल्या निवडणुकीत आश्वासन देऊनही नेतेमंडळींना विसर पडलेला आहे. ग्रामीण रुग्णालयाकडे जाणार्‍या रस्त्याच्या कामाला अगोदर सुरूवात करावी अन्यथा नगर-औरंगाबाद महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी  दिला आहे. या प्रभागातील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला आहे. नेवासा तालुक्यातील काही गावांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे.नेवासा फाटा येथील मुकिंदपूर ग्रामपंचायतीची निवडणूकही आता होणार आहे. गेल्या निवडणुकीत स्थानिक गावपुढारी व नेतेमंडळींनी लोकांना भरभरून आश्वासन दिलेले आहेत. त्यांचा विसर या नेत्यांना पडला आहे. 

आतापर्यंत राजकीय नेत्यांनी एकमेकांच्या जिरवाजिरवीचे राजकारण केलेले आहे. कामांच्या नावाने बोंबाबोंब झालेली असताना याचा ठराव करावा व त्याचा ठराव करू नये, अशा परिस्थितीमध्येच पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे. आता होणार्‍या निवडणुकीत काम न करणार्‍या लोकांना वठणीवर आणण्याची वेळ आलेली आहे. तारा पार्क भागात घाणीचे साम्राज्य झालेले आहे. आयटीआय परिसरात वेड्याबाभळी, घाणीचे साम्राज्य, रस्त्यावर ठिकठिकाणी अस्वच्छ पाणी, ग्रामपंचायती समोर तसेच सावतानगर अशा अनेक भागात कामांचा पत्ताच दिसत नाही.

तारा पार्क भागातील घाणीकडे व आयटीआय परिसरात चोरट्यांच्या धुमाकुळाकडे दूर्लक्ष होत आहे. ग्रामीण रुग्णालयाकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी  कित्येक वेळा आंदोलने करण्यात आली. परंतु कोणीच दखल घेतली नाही. मुकिंदपूर हद्दीतील नगर-औरंगाबाद रस्ता ते ग्रामीण रुग्णालय रस्ता हा गेल्या 15 वर्षांपासून नागरिक पाठपुरावा करित आहे. ठिकाठिकाणी खड्डे पडलेले आहेत. बाजारामुळे नागरिकांची वर्दळ व रुग्णालयात येणार्‍या रुग्णांची तसेच शासकीय कामासाठी लोकांची गर्दी याच रस्त्यावर असते. रस्त्याअभावी सर्वांचे हाल होत आहे. तातडीने या रस्त्यांच्या कामांसाठी हालचाली व्हायला पाहिजे अन्यथा नगर-औरंगाबाद महामार्गावर आंदोलन करण्याचा व निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.