Wed, May 22, 2019 17:07होमपेज › Ahamadnagar › पोलिस ठाण्याच्या आवारात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलिस ठाण्याच्या आवारात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 11:09PM

बुकमार्क करा

शेवगाव : प्रतिनिधी 

पोलिस ठाण्याच्या आवारातच आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या छेडछाडप्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्याच्या उद्देशाने त्याने हा प्रकार केला. या प्रकरणी सदर युवकावर छेडछाड व आत्महत्येचा प्रयत्न, असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील जोहरापूर येथील एक 19 वर्षीय विद्यार्थीनी पदवीचेे शिक्षण घेण्यासाठी शेवगाव येथील महाविद्यालयात जाते. ती बुधवारी (दि.6) सकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकी वाहनावरून शेवगाव येथे महाविद्यालयात येत असताना याच गावातील प्रशांत विक्रम उगलमुगले हा  रस्त्यात तिच्या गाडीला आडवा झाला. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न कर’, असे म्हणून त्याने तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. झालेल्या प्रकाराची तक्रार देण्यासाठी सदर विद्यार्थिनी शेवगाव पोलिस ठाण्यात गेली.

ही विद्यार्थिनी फिर्याद दाखल करीत असल्याचे प्रशांत उगलमूगले यास समजल्याने, तो पोलिस ठाण्यात आला. ‘तुम्ही माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करता काय’, असे म्हणून त्याने ठाण्याच्या आवारातच पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी विषारी औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकाने त्यास तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरूद्ध छेडछाडी बरोबरच आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल केला आहे.

शहरात शालेय विद्यार्थिनींची छेडछाड करण्याचे प्रकार सर्रास होत आहेत शाळेच्या आवारात, गेटवर, रस्त्याने त्यांना रोडरोमीओचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे काही विद्यार्थिनींना शिक्षणापासुन मुकावे लागले आहे. या बाबत शिक्षक, पालक, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रारी केलेल्या आहेत. पोलिसांकडून त्याबाबत दक्षता घेतली जात आहे.