Mon, Jan 21, 2019 15:10होमपेज › Ahamadnagar › फिर्यादीचा अर्ज फेटाळला

फिर्यादीचा अर्ज फेटाळला

Published On: May 09 2018 1:52AM | Last Updated: May 08 2018 11:55PMनगर : प्रतिनिधी

आरोपी पोलिस कोठडीत असताना त्याला तपासाच्या अनुषंगाने कोठे न्यायचे, हा विषय पोलिसांच्या अधिकारक्षेत्रातील असल्याने फिर्यादीचा अर्ज काल (दि. 8) न्यायालयाने फेटाळून लावला आहे. पोलिस कोठडीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. संग्राम जगताप यांना पोलिसांनी कैलास गिरवले यांच्या अंत्यविधीस आणले होते. त्यावर आक्षेप घेण्यात आला होता.

केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी आ. संग्राम जगताप हे पोलिस कोठडीत असताना नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यविधीस अमरधाम स्मशानभूमीत आ. जगताप यांना पोलिस बंदोबस्त आणण्यात आले होते. पोलिस कोठडीतील आरोपीला अंत्यविधीस नेल्याप्रकरणी फिर्यादी संग्राम कोतकर याने वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज करून हरकत घेतली होती. न्यायालयाने त्यावर पोलिसांचे म्हणणे मागविले होते. पोलिसांनी म्हणणे सादर केल्यानंतर त्यावर मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. 

आरोपी हा पोलिस कोठडीत असताना त्याचा ताबा पोलिसांकडे असतो. तपासाच्या अनुषंगाने त्याला कोठे न्यायचे, हा विषय तपासी अधिकार्‍यांच्या अधिकारक्षेत्रात येतो, असे म्हणणे पोलिसांनी सादर केले होते. त्यामुळे न्यायालयाने फिर्यादीचा अर्ज फेटाळून लावला आहे. 

‘एडीआर’चाही अर्ज फेटाळला

भ्रमणध्वनीवरून झालेल्या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग कंपनीकडे उपलब्ध नसते, असे मोबाईल कंपनीच्या नोडल ऑफीसरने लेखी स्वरुपात दिले आहे. त्यामुळे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केलेला आरोपींचे ‘एडीआर’ (मोबाईलवरील संवादाचे संभाषण) मिळण्यासाठी दाखल केलेला अर्ज मंगळवारी फेटाळून लावण्यात आला.