Tue, Jan 22, 2019 07:32



होमपेज › Ahamadnagar › आरोपी सावळेला पुण्याला हलविणार

आरोपी सावळेला पुण्याला हलविणार

Published On: May 09 2018 1:52AM | Last Updated: May 08 2018 11:58PM



नगर : प्रतिनिधी

महापालिकेतील पथदिवे घोटाळ्यातील आरोपी बाळासाहेब सावळे यांची प्रकृती बिघडली आहे. वैद्यकीय उपचारासाठी त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्याचा आदेश मंगळवारी न्यायालयाने दिला आहे, अशी माहिती आरोपी वकील अ‍ॅड. जय भोसले यांनी दिली. तसेच सावळे याच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असून, त्यावर बुधवारी (दि. 9) सुनावणी होणार आहे.

महापालिकेतील 34 लाख रुपयांच्या पथदिवे घोटाळ्यातील आरोपी विद्युत पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावत चालली आहे. त्याच्यावर योग्य वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. त्यासाठी त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्याची मागणी आरोपीच्या नातेवाईकांनी केली होती. त्यावर न्यायालयाने सावळे याला पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्याचा आदेश काल (दि. 8) सायंकाळी दिला आहे.

तसेच वैद्यकीय कारणास्तव सावळे याला जामीन देण्यात यावा, असा अर्जही आरोपीच्या वकिलांनी मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांकडे सादर केला आहे. त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे. सावळे याची प्रकृती काही दिवसांपासून खालावत चालली आहे. गेल्या 15 दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली होती, असे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे.