Mon, May 20, 2019 18:22होमपेज › Ahamadnagar › आरोपींना फाशी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

आरोपींना फाशी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 17 2018 12:00AMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथे दोन शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर घडलेला प्रकार हा शिवसैनिक  व जनतेच्या  भावनेचा उद्रेक होता. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्यातील चुकीची कलमे मागे घ्यावीत. आधी हत्याकांडातील सर्व आरोपींना अटक करा, मग शिवसैनिक स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर होतील. त्यांना पकडण्याची आवश्यकता नाही. कायदा-सुव्यवस्था  राखणे ही पोलिसांची जबाबदारी असून, वाढत्या गुन्हेगारीचा व दहशतीचा बंदोबस्त त्यांनी केला पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

केडगाव येथील शिवसेना उपशहर प्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांची 7 एप्रिलला गोळ्या घालून व धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या दोघांचा दशक्रिया विधी काल(दि.16) केडगाव येथील अमरधाममध्ये झाला. त्यासाठी आलेल्या ना. शिंदे व राज्यमंत्री दादा भुसे यांनी दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर नगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, निफाडचे आ. अनिल कदम, कल्याणचे आ. बालाजी किणीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे,  रावसाहेब खेवरे, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम आदी उपस्थित होते.

ना. शिंदे म्हणाले की, केडगावात दोन कट्टर शिवसैनिकांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. यावरून आरोपींना कायद्याची भीती, धाक नसल्याचे दिसून येत आहे. या गुन्हेगारांवर जरब बसली पाहिजे. जेणेकरून पुढे कुणावर असे प्रसंग येऊ नयेत. भाजप-राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी संगनमताने हे हत्याकांड घडविले असून, यातील आमदारांचे घटनेपूर्वी व घटनेनंतरचे संभाषण पोलिसांनी तपासले पाहिजे. या सर्व बाबींची सखोल चौकशी होऊन पोलिसांनी सत्य बाहेर आणावे. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पवार यांच्या आत्महत्येमागे हीच मंडळी असल्याचा आरोपही ना. शिंदे यांनी यावेळी केला.

दादागिरी, प्रॉपर्टी हस्तगत करण्याचे काम हे लोक करत आहेत. याचाही पोलिसांनी छडा लावला पाहिजे. हत्याकांडातील दाखल असलेल्या गुन्ह्यातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली पाहिजे. गुन्हा करायचा, एसपी ऑफिसची तोडफोड करायची, हे काय चालले आहे? यावर पोलिसांनी जरब बसविला पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेले हे सत्र बंद करून गुन्हेगारांचा बिमोड करण्याचे काम पोलिसांनी करावे. यातील गुन्हेगारांना कठोर शासन होऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.  

शिवसैनिकांवर दाखल असलेल्या गुन्ह्यातील चुकीची कलमे पोलिसांनी काढून टाकावीत. केडगावात शिवसैनिकांच्या भावनेचा तो उद्रेक होता. ते गुन्हेगार नाहीत. त्यांनी कुठलाही कायदा हातात घेतलेला नसताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लवकर पंचनामा व्हावा, आरोपींना अटक करण्यात यावी, ही मागणी करणे गैर आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ठुबे व कोतकर कुटुंबाच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Tags : Ahmadnagar, accused, able,hanging