होमपेज › Ahamadnagar › दुय्यम कारागृहातच जुंपली आरोपींची भांडणे

दुय्यम कारागृहातच जुंपली आरोपींची भांडणे

Published On: Jul 15 2018 1:28AM | Last Updated: Jul 14 2018 10:51PMश्रीगोंदा ः प्रतिनिधी 

श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या दुय्यम कारागृहात दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या दोन आरोपींमध्ये हाणामारी झाली. यात एक जण गंभीर जखमी झाला असून, त्यास उपचारासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार काल (दि.14) पहाटेच्या सुमारास झाला. याप्रकरणी दोघांवर  सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदा दुय्यम कारागृहात दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेले मंगेश भारत चव्हाण (वय 24, रा. जलालपूर, ता. कर्जत) व राजू सायंत्या पवार (रा. पेडगाव, ता. श्रीगोंदा) यांच्यात काल पहाटे किरकोळ कारणातून वाद सुरु झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोघांनी कारागृहातील जेवणाच्या भांड्याने एकमेकास मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी उर्वरित आरोपींची आरडाओरड  झाल्यावर पहार्‍यावर असलेले पोलिस कॉन्स्टेबल ईश्वर भोसले तत्काळ घटनास्थळी गेले. तेथे हे दोन आरोपी जेवणाच्या भांड्याने एकमेकांना मारहाण करताना दिसले. त्यांनी गार्ड अंमलदार महिला पोलिस आशा खामकर व पोलिस कॉन्स्टेबल संतोष कोपनर यांना बोलावून कारागृहाचे बराक क्रमांक 3 चा दरवाजा आरोपींना शांत केली. मंगेश भरत चव्हाण याच्या डोक्यास गंभीर मार लागला. हे लक्षात येताच त्यास तत्काळ उपचारासाठी श्रीगोंदा ग्रामीण  रुग्णालयात हलविण्यात आले. 

याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्याचे ईश्वर भोसले यांच्या फिर्यादीवरुन वरील दोघांविरोधात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून शांतता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल रेवननाथ दहिफळे हे करत आहेत.

आठवड्यातली दुसरी घटना 

मागील आठवड्यात कारागृहात असणार्‍या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकाराची चर्चा थांबते न थांबते तोच पुन्हा कारागृहात मारामारीचा प्रकार झाल्याने खळबळ उडाली आहे. कारागृहाची क्षमता आणि अटक आरोपींची संख्या, यामध्ये मोठी तफावत आहे. आरोपींची संख्या जास्त असल्याने नेहमीच किरकोळ वादावादी सुरू असते. सुरक्षेच्या दृष्टीने कारागृहातील आरोपी इतरत्र हलविण्याची गरज आहे.