Tue, Jul 23, 2019 11:06होमपेज › Ahamadnagar › नगर : गोळीबारातील आरोपीला अटक

नगर : गोळीबारातील आरोपीला अटक

Published On: Jan 26 2018 1:23AM | Last Updated: Jan 26 2018 4:30PMनगर/श्रीगोंदा : प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे दोन गटात झालेल्या वादानंतर  गोळीबार करत पळून गेलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासांच्या आत जेरबंद केले. आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले फॉर्च्युनर वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, मंगळवारी (दि. 23) गव्हाणेवाड़ी शिवारात क्रिकेट सामन्यात नो बॉलवरून लाला उर्फ संतोष गव्हाणे याचे दोन साथीदार व निलेश पांडुरंग काळे यांच्यात मारामारी झाली. त्यानंतर गव्हाणे याने निलेश काळेवर गावठी कट्यातून गोळीबार करून जखमी केले. बेलवंडी पोलिसांनी काळे गटातील सात तर गव्हाणे गटातील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 

पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी पुण्यात असल्याची खात्री झाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील सहायक निरीक्षक शरद गोर्डे, संदीप पाटील, राजकुमार हिंगोले, कॉन्स्टेबल मनोहर शेजवळ, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, विशाल अमृते आदींच्या पथकाने सापळा रचला. दिवसभर वेषांतर करून आरोपीस शिताफीने ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून फॉर्च्युनर गाडी (एमएच 10 ए एक्स 8800) ताब्यात घेण्यात आली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता 29 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.