Fri, Mar 22, 2019 05:33
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › गणेशोत्सव मंडप तोडल्याने शिवसेना झाली आक्रमक

गणेशोत्सव मंडप तोडल्याने शिवसेना आक्रमक

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 04 2018 1:16AMनगर : प्रतिनिधी

राज्यात शिवसेना-भाजप सत्तेत एकत्र असले, तरी दोघांचे विचार एकसारखे नाहीत. शिवसेनेने कायम हिंदुत्वासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र, भाजप सरकारच्या आदेशानुसारच हिंदूंच्याच सणांवर निर्बंध घातले जात आहेत. गणेश मंडळांवर चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली कारवाई, ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व भाजपाच्या दबावातूनच सुरू आहे. 

प्रशासनालाच शहरात शांतता नको आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केली आहे. मंडपावर नियमानुसार कारवाई न करता दादागिरी करत तोडफोड करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईच्या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आल्याचे त्यांनी  पत्रकार परिषदेत सांगितले.

नेता सुभाष चौकातील विनापरवाना गणेश मंडपावर करण्यात आलेल्या कारवाईच्या पद्धतीवर आक्षेप घेत आक्रमक झालेल्या शिवसेनेने सोमवारी (दि.3) उपोषण सुरू केले आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत उपनेते राठोड यांनी सरकारच्या धोरणावर टीकास्त्र सोडतांनाच प्रशासनावर दंडेलशाहीचा आरोप करत निषेध केला. राठोड म्हणाले की, वर्षानुवर्षे नेता सुभाष चौकात गणेश मंडप उभारला जातो. दरवर्षी त्याची परवानगी घेतली जाते. याही वर्षी 29 ऑगस्टला आम्ही परवानगीसाठी अर्ज घेवून गेलो होतो. मात्र, प्रशासनाने परवानगी देण्यास कक्षच उभारला नव्हता. 

मुळात गणेश मंडप उभारण्यासाठी किमान 15 ते 20 दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे प्रशासनाने महिनाभरापूर्वीच गणेश मंडपांसाठी परवानगी देण्याची सुविधा उपलब्ध करणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाने शनिवारी (दि.1) परवानगी देण्यास सुरुवात केली. त्यात रविवार आल्यामुळे परवानगी मिळू शकली नाही. मनपाचे पथक कारवाईला आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. मात्र, शहरात उत्सव शांततेत साजरे व्हावेत, अशी प्रशासनाचीच इच्छा नसल्याचे चित्र आहे. 

प्रशिक्षणार्थी असलेल्या अधिकार्‍याने कुठलाही विचार न करता गणेश मंडपावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली. मंडप उभारणार्‍या व्यक्तीने त्यांना मंडप काढून घेण्यासाठी एका तासाची मुदत मागितली होती. त्याकडे दुर्लक्ष करत प्राजित नायर व सुरेश इथापे यांनी दादागिरी करत चक्क जेसीबीच्या सहाय्याने मंडप साहित्याची तोडफोड केली. चुकीच्या पद्धतीने सुरु केलेल्या कारवाईमुळे हिंदू धर्मियांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. शिवसेनेने या चुकीच्या कारवाईला आक्षेप घेवून कोतवाली पोलिसांत या दोन अधिकार्‍यांविरोधात नुकसान केल्याची व धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार केली आहे. या अधिकार्‍यांवर कारवाई होईपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशाराही राठोड यांनी दिला.

महासभेच्या प्रचलित धोरणाकडे वेधले लक्ष!

उच्च न्यायालयाने उत्सव काळातील उपाययोजनांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक परिस्थितीचा विचार करुन महापालिकेने धोरण ठरवायचे आहे. महापालिकेचे धोरण अद्याप निश्‍चित नाही. महासभेने प्रचलित धोरणानुसारच कार्यवाही करावी, असा ठराव केलेला आहे. तसेच आम्ही उभारलेला गणेश मंडप रस्त्याला मोठा अडथळा मुळीच नव्हता. विसर्जन मार्गावरही हा मंडप येत नाही. यापूर्वी यापेक्षा मोठ्या मंडपाला परवानगी देण्यात आलेली असतांना, याच वर्षी तोडफोड करुन कारवाई करावी, असे काय घडले? असा सवाल अनिल राठोड यांनी उपस्थित केला आहे.

पोलिसांकडून उपोषण मागे घेण्याचे आवाहन!

शिवसेनेने उपोषण सुरू केल्यानंतर पोलिस प्रशासनाच्या वतीने कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी राठोड यांच्याशी दुपारी चर्चा करून उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. शिवसेनेचा तक्रार अर्ज वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, महापालिका प्रशासन पोलिस यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचे स्पष्ट करत जोपर्यंत अधिकार्‍यांवर नुकसान केल्याप्रकरणी कारवाई होत नाही, तो पर्यंत माघार घेणार नसल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचेही राठोड यांनी यावेळी सांगितले.