Tue, Mar 26, 2019 21:53होमपेज › Ahamadnagar › ‘बाजार समिती’चे २८ गाळे पाडणार!

‘बाजार समिती’चे २८ गाळे पाडणार!

Published On: Jul 31 2018 1:28AM | Last Updated: Jul 31 2018 12:38AMनगर : प्रतिनिधी

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटच्या आवारातील खुल्या जागेत बांधण्यात आलेल्या 28 गाळ्यांचे बांधकाम नियमित करण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर, आता सदरचे गाळे पाडण्याचे आदेश उपायुक्‍त प्रदीप पठारे यांनी बजावले आहेत. शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या तक्रारीनुसार महापालिकेने सुनावणी घेऊन सदरचे आदेश दिले आहे. दरम्यान, बाजार समितीला बांधकाम काढून घेण्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, त्यानंतर मनपामार्फत कारवाई होणार आहे.

नगररचना योजना क्रमांक 3 मधील अंतिम भूखंड 23 मधील 28 हजार चौरस फूट क्षेत्राच्या खुल्या जागेवर कृषि उत्पन्न बाजार समितीने तेथील 28 व्यापार्‍यांना जागेचे वाटप करून कराराने जागा उपलब्ध करुन दिली होती. या खुल्या जागेवर बांधकामासाठी परवानी नसतानाही पत्र्याचे शेड व काही प्रमाणात पक्की बांधकामे करुन गाळे उभारण्यात आले आहेत. महापालिकेने सदर गाळ्यांना अनधिकृत बांधकामाचा दर्जा देवून, त्यानुसार दंडासह कर आकारणी सुरू केली आहे. या गाळ्यांच्या वाटपात गैरव्यवहार झाल्याची व बांधकामे अनधिकृत असल्याच्या तक्रारीही झालेल्या आहेत. या अनधिकृत बांधकामांबाबत शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने जागेची मोजणी करून व प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार केला. त्यानुसार उपायुक्‍त पठारे यांच्या समोर सुनावणी पार पडली.

दरम्यानच्या काळात सदरची बांधकामे नियमित करण्यासाठी बाजार समितीकडून हालचाली सुरू झाल्या. समितीने महापालिका प्रशासनाकडे बांधकामे नियमित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, मंजूर रेखांकनातील खुल्या जागेत बांधकाम अनुज्ञेयच नसल्याचे स्पष्ट करत, नगररचना विभागाने हा प्रस्ताव फेटाळला होता. उपायुक्‍तांसमोर सुरु असलेल्या सुनावणीतही नगररचना विभागाकडून याबाबतचा अभिप्राय देण्यात आला होता. त्यामुळे मंजूर रेखांकनातील खुल्या जागेत करण्यात आलेले गाळ्यांचे बांधकाम पाडण्याचे आदेश उपायुक्‍तांनी बजावले आहेत. बाजार समितीने स्वतःहून 15 दिवसांच्या आत सदरचे बांधकाम काढून घ्यावे. अन्यथा मुदतीनंतर महापालिकेमार्फत सदरची कारवाई करण्यात येईल व त्याचा खर्च बाजार समितीकडून वसूल केला जाईल, असेही उपायुक्‍त पठारे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, भाजप आ. शिवाजीराव कर्डिले यांचे वर्चस्व असलेल्या कृषि उत्पन्न बाजार समितीविरोधात शिवसेना शहरप्रमुखांनी केलेल्या तक्रारीवर महापालिकेकडून कारवाईचे आदेश बजावण्यात आल्यामुळे या प्रकरणात नगर शहर शिवसेनेने आ. कर्डिले यांना मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे.