Sat, Jan 19, 2019 01:25होमपेज › Ahamadnagar › ग्रामसेवकांची दिंडी पंढरपूरकडे रवाना

११ हजार वृक्ष लागवडीसह शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचवणार

Published On: Jul 07 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 10:49PMनगर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या संकल्पनेतून ग्रामसेवकांची नगर ते पंढरपूर अशी पायी प्रबोधन दिंडी शुक्रवारी नगर शहरातून मार्गस्थ झाली. पायी दिंडीदरम्यान ठिकठिकाणी 11 हजार वृक्ष लागवड करण्यासह शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ग्रामसेवक करणार आहेत.

दिंडी प्रस्थानप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, परीक्षित यादव, प्रशांत शिर्के, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीकांत अनारसे, गट विकास अधिकारी अलका शिरसाठ, अनिल  गिते आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागासाठी शासनामार्फत राबविण्यात येणार्या योजनांची प्रत्यक्ष गावांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात ग्रामसेवक महत्त्वपूर्ण योगदान देत असतात. या दिंडीतून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवतानाच त्याला अध्यात्माचे अनुष्ठानही देणार आहे. या मार्गात वृक्षारोपण करण्याबरोबरच सामाजिक संदेशही देण्यात येणार आहेत. यातून प्रशासन व सर्वसामान्य जनता यांच्यातील सुसंवाद आणखी व्यापक होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनी व्यक्त केला.

ढाकणे म्हणाले की, आषाढी वारीच्या परंपरेत प्रत्येकाला तणावमुक्त करण्याची ताकद आहे. मुक्कामाच्या ठिकाणी किर्तन, दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे, सेवा हमी कायदा, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, स्वच्छता अभियान, नरेगा योजना, शौचालय वापर, निर्मल ग्राम, अंधश्रध्दा निर्मूलन, व्याख्याने, भारूड, लघुपटाच्या माध्यमातून गावोगावी प्रबोधन केले जाणार आहे. पंढरपूरला पोहचल्यावर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचे साकडे पांडुरंगाच्या चरणी घालण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पांढरी शुभ्र वेशभूषा, डोक्यावर टोपी, टाळमृदुंगाचा गजर आणि मुखी हरिनाम अशा प्रसन्नचित्त वातावरणात सर्व ग्रामसेवक अतिशय शिस्तबध्दरित्या दिंडीत 200 ग्रामसेवक सहभागी झाले आहेत.