Thu, Apr 25, 2019 21:38होमपेज › Ahamadnagar › सीईओंचे झेडपीवरील नियंत्रण सुटले!

सीईओंचे झेडपीवरील नियंत्रण सुटले!

Published On: Apr 27 2018 12:51AM | Last Updated: Apr 26 2018 11:26PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत आल्यानंतर अधिकार्‍यांना कामासंदर्भात बोलावले असता, अधिकारीच उपलब्द्ध नसतात. कुठल्याही प्रकारची कामे होत नाहीत. नागरिकांची कामे होत नाहीत. अधिकार्‍यांना विचारणा केली असता व्हिडीओ कॉन्फरसिंग असल्याचा बहाणा सांगण्यात येतो. खालच्या अधिकार्‍यांवर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे नियंत्रण राहिले नसल्याचा आरोप अध्यक्षा शालिनी विखे यांनी केला.

वेळोवेळी कार्यालयात आल्यानंतर स्वतः अध्यक्षांनाच अधिकारी उपलब्द्ध होत नसल्याने अध्यक्षा विखे संतप्त झाल्या. त्यानंतर अचानक बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत विखेंनी जिल्हा परिषदेतील अधिकार्‍यांच्या कारभाराची पोलखोल केली. स्वतः अध्यक्षांनाच अशा प्रकारची वागणूक मिळत असेल तर सामान्य जनतेचे कसे होणार? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ना. विखे म्हणाल्या की, जिल्हा परिषदेतील कामासंदर्भात सर्व विभागप्रमुखांना यापूर्वीच पात्र दिले. आठवड्यात सोमवारी व मंगळवारी अधिकार्‍यांनी कार्यालयात हजर राहिलेच पाहिजे. बाहेर जायचे असल्यास अध्यक्ष कार्यालयाला लेखी कळवायला हवे. मात्र असे होत नाही. नागरिक कामासाठी हेलपाटे मारत असतांना अधिकारी मात्र ‘व्हीसी’चे कारण देत दिवसदिवस गायब असतात. मंत्रालयातील अधिकार्‍यांनी आठवड्यातील एक - दोन दिवस ‘व्हीसी’साठी राखून ठेवले पाहिजेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले. पण त्यावरही कारवाई झालेली नाही.

जिल्हा परिषदेच्या सभेत यापूर्वी दर सोमवार व मंगळवारी अधिकार्‍यांनी मुख्यालयात थांबण्याचा ठराव घेण्यात आला होता. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या कानावर ही बाब घातली. त्यांनी खालच्या अधिकार्‍यांचे नुसते पगार जरी रोखले तरी अधिकारी कामे करतील. अध्यक्षा असल्याने नागरिक कामे, तक्रारी घेऊन येतात. मात्र अधिकारीच नसल्याने रिकाम्या हाताने त्यांना माघारी जावे लागते. आता लागोपाठ सुट्ट्या आल्याने आजही अनेक अधिकारी गायब आहेत. अध्यक्षांनी काम करायचे की नाही असा सवाल उपस्थित होत असल्याचेही विखे म्हणाल्या. अनेक अधिकारी - कर्मचारी सह्या करून निघून जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

पेन्शनर्सची टोलवाटोलवी

मार्च महिन्याची पेन्शन जमा न झाल्याने पेन्शनर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी अध्यक्षा विखेंनी भेट घेतली. यावेळी सोमनाथ गायकवाड,  बन्सी उबाळे, शशिकांत इथापे, मन्साराम सुतार यांचा समावेश होता. ज्या त्या महिन्याची पेन्शन 1 तारखेलाच देण्याचे न्यायालयाचे आदेश असूनही जमा होत नाही. अध्यक्षांनी संबंधित अधिकार्‍यांना बोलावून झापले. पेन्शन ट्रेझरीत गेल्याचे सांगणार्‍या कर्मचार्‍याचे पितळ उघडे पडले.